Crime News Marathi : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका निर्दयी वडिलाने आपल्या 12 वर्षांच्या मुलाची कोयत्याने वार हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह लोखंडी पेटीत लपवून ठेवत गावातून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मक्खनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिजोली गावात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, आरोपीचे नाव राजेश असून तो जिजोली गावचा रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजेश आणि त्याची पत्नी उर्मिला यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मालमत्तेच्या वादावरून सतत वाद होत होते. उर्मिला ही एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. राजेशला नशेचे व्यसन असल्याचेही पोलिस तपासात समोर आले असून, याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी सकाळी घरातील वातावरण नेहमीप्रमाणेच होते. उर्मिला रोजच्या दिनक्रमानुसार शाळेत गेली. त्या वेळी घरात राजेश आणि त्यांचा 12 वर्षांचा मुलगा मयंक हे दोघेच होते. मात्र दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर उर्मिलाला घरातील परिस्थिती संशयास्पद वाटली. घरात राजेश दिसत नव्हता आणि आत रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे उर्मिलाची घालमेल उडाली आणि तिने आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शोधादरम्यान घरातील एका लोखंडी पेटीत मुलाचा मृतदेह कोंबून ठेवलेला आढळून आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक अनुज चौधरी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, मुलाचा मृतदेह पेटीत लपवून ठेवण्यात आला होता. हा प्रकार पाहताच उर्मिलाने आक्रोश केला. तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात दाखल झाले. मृत मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. उर्मिला यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात राजेशने धारदार शस्त्राने, बहुधा कोयत्याने, आपल्या मुलाची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या केल्यानंतर तो घरातून पळून गेल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. आरोपीच्या अटकेनंतर या भीषण घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेने मात्र माणुसकीला काळीमा फासला असून, संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











