Crime News : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या मोठ्या भावाची, भावजयीची आणि तीन वर्षांच्या पुतण्याची झोपेत असताना हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्येचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेल्या नऊ वर्षांच्या पुतणीने आरडाओरडा करत खोलीबाहेर धाव घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तिच्या आवाजामुळे घरातील वडील आणि आई जागे झाले. वडील मोठ्या मुलाच्या खोलीत पोहोचले असता तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर धाकटा मुलगा रक्ताने माखलेल्या धारदार शस्त्रासह खोलीतून बाहेर येताना दिसला.
ADVERTISEMENT
"जेलमध्ये तरी जेवण मिळेल ना?"
घटनेनंतर आरोपी मुलगा घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन शांतपणे बसून राहिला. काही वेळाने वडिलांनी शेजारी आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वडिलांनीच धाकट्या मुलाने हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता आरोपी हातात गंडासा घेऊन जमिनीवर बसलेला आढळला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान हत्या का केली, असे विचारल्यावर आरोपी रडू लागला आणि भावजयीने दोन दिवस जेवण दिले नव्हते, म्हणून हत्या केल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना "जेलमध्ये तरी जेवण मिळेल ना?" असाही प्रश्न विचारला.
हेही वाचा : 'Operation Tiger देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनात झालं', भाजप आमदाराचा गौप्यस्फोट
आई व भावालाही ठार मारले
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मानसिक तणाव आणि कुंठेत वावरत होता. त्याला योग्य अन्न, कपडे मिळत नसल्याची भावना होती. त्याला शिक्षण घ्यायचे होते, मात्र त्याला शिकू दिले गेले नाही, अशी त्याची तक्रार होती. तो कुटुंबीयांकडे सातत्याने अन्याय होत असल्याचे सांगत असे. घटनेच्या रात्री मोठा भाऊ अमित गुप्ता, पत्नी रंजना, नऊ वर्षांची दत्तक मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा रेयांश यांच्यासह झोपला होता. आरोपीने पहाटे खोलीत प्रवेश करून झोपेत असलेल्या मोठ्या भावावर, भावजयीवर आणि पुतण्यावर गंडास्याने सपासप वार केले. या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मात्र दत्तक पुतणीचा जीव वाचला. तिने सांगितले की, चाचाने आधी वडिलांवर हल्ला केला आणि त्यानंतर आई व भावालाही ठार मारले. गोरखपूर जिल्ह्यातील बांसगाव परिसरात ही घटना घडली.
तपासादरम्यान कुटुंबातील मालमत्ता आणि दुकानाच्या वादाचाही मुद्दा समोर आला आहे. कुटुंबाची किराणा दुकान असून त्यात आरोपी बसत होता. काही महिन्यांपूर्वी मोठा भाऊ गावात परतल्यानंतर दुकानावर त्याचा ताबा होईल, अशी भीती आरोपीला वाटत होती. यामुळे घरात सातत्याने वाद होत होते. वडील हरीलाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन महिन्यांपूर्वीही आरोपी आणि वडिलांमध्ये पैशांवरून वाद झाला होता. आरोपी पाच लाख रुपयांची मागणी करत होता. स्थानिक पोलिस ठाण्यात त्यावेळी दोघांमध्ये समझोता करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून हत्येमागील सर्व कारणांचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT











