Delhi Minor Girl Rape Case : माणुसकीला काळिमा फासणारी आणि लाज आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्राफिक सिग्नलवर गुलाबाची फुलं विकणाऱ्या 11 वर्षीय मुलीला जंगलात नेऊन एका ई-रिक्षा ड्रायव्हरने लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर पोलिसांनी 300 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील ही घटना आहे. मात्र या घटनेमुळे देशाच्या राजधानीतील मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT
ही लाज आणणारी घटना 11 जानेवारी रोजी घडली. पीडित मुलगी ही दिल्लीतील प्रसादनगर भागात गुलाबाची फुलं विकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय आरोपी दुर्गेशने रिक्षातील प्रवाशांना सोडल्यानंतर मुलीजवळ रिक्षा थांबवली आणि तिची गुलाबाची सर्व फुलं विकण्याचं आश्वासन देऊन तिला फसवले. मुलगी त्याच्या बोलण्याला बळी पडली आणि रिक्षात बसली.
जंगलात नेऊन केले लैंगिक अत्याचार
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी पीडितेला दिल्लीतील प्रोफेसर रामनाथ वीज रोडजवळील एका जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडिता बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडली. ती मृत झाल्याचे समजून आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. शुद्धीत आल्यानंतर पीडिता तशाच अवस्थेत घरी पोहोचली. यानंतर कुटुंबियांनी तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि पोलिसात तक्रारही दाखल केली.
300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने उघडकीस आले प्रकरण
तपासाच्या सुरुवातीला पीडिता मानसिक धक्क्यात असल्याने पोलिसांना तपास करणे अवघड झाले होते. ज्या ठिकाणापासून मुलगी त्या रिक्षात बसली तिथून जंगलापर्यंत जाणाऱ्या 15 रोड्सवरील तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. एका फुटेजमध्ये पीडिता रिक्षात बसताना दिसली. यानंतर त्या रिक्षाच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाचा तपास घेत पोलिसांनी आरोपीला गाठले आणि त्याला अटक केली.
आधीच रचला होता कट
चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, हा कट त्याने आधीच रचला होता. गेल्या काही दिवसांपासून आरोपी त्या मुलीला सिग्नलवर बघत होता. आरोपीच्या माहितीवरुन पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडे आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. तसेच त्याच्याविरोधात अपहरण, बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT











