Gorakhpur Crime News : गोरखपूरमध्ये घडलेल्या 10 वर्षीय वैभव वर्माच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चौथीत शिकणारा वैभव दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर आपली नवी सायकल घेऊन घराबाहेर पडला, मात्र त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा कोणताही मागमूस लागला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो घराजवळील गल्लीत गेल्यानंतर गायब झाल्याचे दिसून आले. त्याच परिसरात संगणक शिक्षक सर्वेश भट्ट राहत होता. तपासादरम्यान एका सीसीटीव्हीमध्ये सर्वेश एका शेतात मुलाची चप्पल फेकताना दिसला. त्याच शेताजवळ वैभवची सायकलही आढळून आली. यानंतर अपहरणाचा संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी सर्वेशला ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा आधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं
वैभवचा मृतदेह तळघरात सापडला
सर्वेश भट्टला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. मात्र, त्याच्या घराची सुरुवातीला सखोल झडती घेण्यात आली नाही. त्यामुळे वैभवचा मृतदेह त्याच घराच्या तळघरात असूनही तो लगेच सापडला नाही. सुमारे 17 तास चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस आरोपीला घेऊन त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा तळघरात गोणीत भरून ठेवलेला वैभवचा मृतदेह ताब्ताय घेण्यात आला. आरोपी आधीपासून पोलिसांच्या ताब्यात असतानाही मृतदेह शोधण्यासाठी इतका वेळ का लागला, तसेच सुरुवातीच्या झडतीत तळघराची तपासणी का झाली नाही, यावर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर पोलिसांच्या तपास पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
हेही वाचा : आईच्या हत्येचं गुपित लपवण्यासाठी 6 वर्षांच्या मुलाचीही हत्या; 10 दिवसांनी झाला उलगडा
व्यापाऱ्याच्या नातवाचे अपहरण करून 1 कोटींची खंडणी मागितली
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सर्वेश भट्ट हा संगणक शिक्षक असून त्याने अपहरणाचा कट रचण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)चा आधार घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. अपहरण कसे करायचे, खंडणी कशी मागायची आणि पोलिसांची दिशाभूल कशी करायची, यासाठी त्याने तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. आरोपीवर बँकेचे सुमारे 25 लाख रुपयांचे कर्ज होते आणि त्याच्या मासिक हप्त्याचा आर्थिक ताण होता. हा कर्जाचा बोजा फेडण्यासाठी परिसरातील एका मोठ्या व्यापाऱ्याच्या नातवाचे अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा त्याचा उद्देश होता, अशी माहिती तपासात समोर आली. मात्र, वैभवने अपहरणाच्या वेळी आरडाओरडा सुरू केल्याने आरोपीने त्याचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह गोणीत भरून घराच्या तळघरात लपवून ठेवला.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे वैभवचा मृतदेह घरात असल्याची माहिती आरोपीच्या कुटुंबीयांनाही होती, असा आरोप आहे. तरीही त्यांनी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. उलट गावकऱ्यांसोबत वैभवचा शोध घेत असल्याचे नाटकही करण्यात आले. चौकशीदरम्यान सर्वेशने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुरावे लपवणे, नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आणि पोलिसांना माहिती न दिल्याच्या आरोपाखाली त्याच्या कुटुंबातील आणखी सहा सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गोरखपूरमध्ये मोठी चर्चा सुरू असून तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ADVERTISEMENT












