Haryana Crime News : हरियाणातील रेवाडीमध्ये भाजप नेत्याच्या 40 वर्षीय पुतण्याची त्याच्याच मित्राने लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जितेंद्र असे मृताचे नाव आहे. मित्राची पत्नी आणि जितेंद्र यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याच संशयातून प्रवीण उर्फ पपला याने जितेंद्रच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी प्रवीणसह त्याचा पुतण्या अमन याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
जितेंद्रच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला
7 सप्टेंबर रोजी जितेंद्रचा रक्ताने माखलेला मृतदेह एचपीसीएल रिफायनरीजवळ भाडावासच्या दिशेने जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर आढळला. पोलिसांना जितेंद्रच्या डोक्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्या. या जखमा एखाद्या जड वस्तूने हल्ला केल्याचे दिसून आले. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले. जितेंद्रच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेला संशय आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी प्रवीण आणि अमनला ताब्यात घेतले.
बिअर पार्टीच्या बहाण्याने बोलावून रचला कट
पोलिसांच्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर रोजी प्रवीणने बिअर पार्टीच्या बहाण्याने जितेंद्रला बोलावले. त्यानंतर दोघे आधी दारूच्या दुकानात गेले. तेथून ते कालव्यावरील पुलाजवळ गेले आणि दोघांनी बीअर प्यायली. त्यानंतर प्रवीणने जितेंद्र आणि त्याचा पुतण्या अमन यांना एचपीसीएल रिफायनरीजवळील निर्मनुष्य रस्त्यावर नेले. जितेंद्र गाडीतून खाली उतरल्यानंतर प्रवीणने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात जितेंद्रचा मृत्यू झाला. अमन हल्ल्यावेळी लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्येनंतर एसपी हेमेंद्र कुमार मीना यांनी पोलिसांच्या पथकांना तपासाचे निर्देश दिले. पथकांनी संयुक्तपणे तपास करत प्रवीण उर्फ पपला आणि अमनला अटक केली. एएसपी दीपिका अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान प्रवीणने जितेंद्रचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. हत्येसाठी वापरलेले वाहन आणि लोखंडी रॉड जप्त करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












