नागपूर : 9 वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील कृत्य, जमावाच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू

योगेश पांडे

• 02:26 PM • 07 Oct 2026

Nagpur Crime News : नागपुरात 9 वर्षांच्या मुलीला फसवून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे.

Nagpur Crime News

Nagpur Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नागपूर : 9 वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

point

जमावाच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू

Nagpur Crime News : नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 वर्षांच्या मुलीला फसवून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला संतप्त जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृत व्यक्तीची ओळख नारायण वैष्णव (वय 35, रा. शिवनगर, पारडी) अशी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

संतप्त नागरिकांची आरोपीला मारहाण 

मंगळवारी रात्री साधारण 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान नारायण वैष्णव याने 9 वर्षांच्या मुलीला फसवून आपल्या घरी नेल्याचा आरोप आहे. मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करतात. घटनेच्या वेळी ते कामावरून घरी परतले नव्हते. नारायणने मुलीला तिचे आई-वडील घरी परतले असून, त्यांनी तिला त्याच्या घरी राहण्यास सांगितल्याचे सांगून तिची दिशाभूल केली. त्यानंतर त्याने मुलीला घरात नेले आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. ही बाब काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर ही माहिती संपूर्ण वस्तीत पसरली आणि संतप्त झालेल्या काही नागरिकांनी नारायणला घेरून त्याची बेदम मारहाण केली.

हेही वाचा : सांगली : आईने सव्वा वर्षाच्या चिमुकलीला कात्रीने वार करुन संपवलं, जराही दया-माया दाखवली नाही

रात्री साधारण 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्याचवेळी मुलीचे नातेवाईकही तक्रार दाखल करण्यासाठी पारडी पोलीस ठाण्यात पोहोचले. माहिती मिळताच गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी नारायण रक्तबंबाळ अवस्थेत जमावाच्या ताब्यात होता. पोलिसांनी त्याला जमावाच्या तावडीतून सोडवून  रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत्यू होण्यापूर्वी नारायणने पोलिसांना दिलेल्या जबाबात जमावातील 8 ते 10 जणांनी आपल्याला मारहाण केल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांना आपण ओळखत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मारहाण करणारे लोक तेथून पसार झाले होते. या प्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या मारहाणीप्रकरणी ठोस पुरावा हाती लागलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलीस करत आहेत.