नागपूरः पबमध्ये प्रवेश आणि सर्व्हिसवरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने पेट्रोल टाकून कॅफेला आग लावल्याची घटना नागपुरात समोर आली आहे. शिवाजीनगर येथील द बॅरेल कॅफेमध्ये घडलेल्या या आगीमुळे सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, 5 सप्टेंबरच्या रात्री मनमोहन उर्फ निखिल बुद्धसागर तिवारी हा कॅफेमध्ये गेला होता. प्रवेशाच्या वेळी त्याच्याकडे असलेल्या काही संशयास्पद वस्तू आत नेण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर प्रवेशासाठी त्याच्याकडून काही पैसे जमा करून घेण्यात आले आणि त्याला कॅफेमध्ये प्रवेश देण्यात आला.
कॅफेमध्ये त्याने मद्य खरेदी केले. मात्र, ते बनावट असल्याचा संशय आल्याने आणि पैसे देऊनही अपेक्षित सर्व्हिस मिळाली नसल्याने तो नाराज झाला. या नाराजीतून तो कॅफेबाहेर पडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मित्राला फोन केला, पेट्रोल घेऊन पुन्हा कॅफेत पोहोचला
पोलिसांच्या तपासानुसार, कॅफेबाहेर आल्यानंतर मनमोहनने त्याचा साथीदार शुभम श्रीकृष्णकुमार विश्वकर्मा याला फोन केला. त्यानंतर शुभमला त्याच्या कामाच्या हॉटेलमधून घेऊन दोघे पुन्हा कॅफेजवळ पोहोचले.
आरोपानुसार, मनमोहनने स्वतःच्या गाडीतून पेट्रोल काढले आणि कॅफेला आग लावली. या घटनेनंतर दोघेही तेथून फरार झाले.
CCTV फुटेजमधून आरोपींची ओळख
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी कॅफेमधील CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये एक व्यक्ती कॅफेमध्ये प्रवेश करताना आणि त्यानंतर आग लावून बाहेर पडताना दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली.
फर्निचरसह महत्त्वाचे साहित्य जळाले
या आगीमध्ये कॅफेतील पाच एसी, सोफा सेट, लाकडी टेबल-खुर्च्या, दरवाजा, महत्त्वाची कागदपत्रे आणि लाइट्स यांसह इतर साहित्य जळाले. या आगीमुळे सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दोन्ही आरोपी कोण?
या प्रकरणातील मुख्य आरोपी मनमोहन उर्फ निखिल बुद्धसागर तिवारी (३१) असून, त्याचा साथीदार शुभम श्रीकृष्णकुमार विश्वकर्मा (२२) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनमोहन हा सध्या नागपुरातील खामला परिसरात स्वतःचे हॉटेल चालवत असल्याचे समोर आले आहे.
शुभम हा मूळचा भोपाळचा असून, नागपुरात हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधित काम करतो. तो नंदनवनमधील शास्त्रीनगर येथील सोमरस हॉटेलमध्ये राहून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तोही शेफ म्हणून काम करतो.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
अंबाझरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमागील संपूर्ण कट, दोघांची नेमकी भूमिका आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT












