सांगली : केतनराज अ‍ॅकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संस्थापकाला अटक

मुंबई तक

08 Sep 2026 (अपडेटेड: 08 Sep 2026, 01:55 PM)

Sangli Crime News : गोटखिंडीतील 'केतनराज स्पर्धा परीक्षा अकॅडमी'मध्ये तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकॅडमीचा संस्थापक आणि त्याच्या पत्नीविरोधात पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल असून संचालकाला अटक करण्यात आली आहे.

Sangli Crime News

Sangli Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सांगली : केतनराज अ‍ॅकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

point

संस्थापकासह त्याच्या पत्नीला अटक

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील 'केतनराज स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी'मध्ये निवासी शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकॅडमीचा संस्थापक काशीनाथ रामचंद्र नांगरे आणि त्याला साथ देत मुलींना धमकावणारी त्याची पत्नी मनीषा काशीनाथ नांगरे (दोघेही रा. गोटखिंडी, ता. वाळवा) यांच्याविरोधात आष्टा पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध गंभीर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि अकॅडमीचा संचालक काशीनाथ रामचंद्र नांगरे याला आष्टा पोलिसांनी अटक केली आहे. अकॅडमीमध्ये निवासी शिक्षणासाठी राहणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली या घटनेतील पीडित असून, त्यांच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार समोर आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’च्या दिशेने शिंदेसेनेची वाटचाल; ठाकरेंच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार

मुलींना मदत करण्याऐवजी हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न

आष्टा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 11 जून 2026 पासून गोटखिंडी येथील 'केतनराज अकॅडमी'त हा संतापजनक प्रकार वारंवार घडत होता. अकॅडमीमध्ये निवासी शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन मुली रात्री झोपेत असताना संस्थापक काशीनाथ नांगरे याने त्यांच्याजवळ जाऊन लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केला होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित विद्यार्थिनींनी घडलेल्या घटनेची माहिती अकॅडमीतील मॅडम आणि आरोपीची पत्नी मनीषा नांगरे हिला दिली होती. मात्र, मुलींना मदत करण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे.

हेही वाचा : लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न, पण चारच महिन्यात तलावात आढळले मृतदेह

संस्थापक पतीसह पत्नीविरोधात गुन्हा दाखल 

पीडित मुलींनी मनीषा नांगरे हिला घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर तिने त्यांना मदत करण्याऐवजी थेट धमकी दिल्याचा आरोप आहे. "कोणाला काही सांगू नका, नाहीतर तुमचे शाळेचे नुकसान करेन," अशी धमकी देत तिने मुलींना गप्प राहण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेची माहिती बाहेर सांगण्यास पीडित मुली घाबरल्या होत्या. मात्र, अखेर त्यांनी हिंमत दाखवत आपल्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली. मुलींकडून ही माहिती मिळाल्यानंतर संतापलेल्या पालकांनी तात्काळ आष्टा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींविरोधात कारवाई सुरू केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(2), 351(2) तसेच पोक्सो कायद्यातील कलमांन्वये काशीनाथ नांगरे आणि मनीषा नांगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक अत्याचार आणि विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी संचालक काशीनाथ रामचंद्र नांगरे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ईश्वरपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. अकॅडमीमध्ये निवासी शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणात आष्टा पोलीस पुढील कारवाई करत आहेत.