Pune Crime News : एक रीलस्टार महिला पोलिस. डॅशिंग आणि जणू सेलिब्रेटीच. जिचे सोशल मीडियावर भरपूर फॉ़लोअर्स. दामिनी पथकात जबरदस्त असं काम केल्याच्या बातम्याही वॉलवर दिसताहेत. मात्र आता हीच महिला पोलिस एका प्रकरणात अडकलीय. तिच्यासोबत एक पीएसआय आणि आणखी एक पोलिस कर्मचारी देखील आहेत. एका कॉलेजच्या प्राचार्याला ब्लॅकमेल करत तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : हर्षवर्धन सपकाळ यांची मोठी घोषणा, काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांविरोधातील उमेदवारी अर्ज मागे
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील कर्मचारी आणि सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. आरोपींनी संबंधित प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत पैशांची मागणी केली होती. कॉलेजमधील एका अल्पवयीन विद्यार्थीनीला हाताशी धरुन फिर्यादी प्राचार्यांच्या विरोधात खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन सदर प्राचार्यांना अटक करण्याची आणि संस्थेच्या बदनामीची भीती दाखवली. आणि तब्बल 7 लाख रुपये उकळल्याची तक्रार करण्यात आलीय. यातील आरोपी पोलीस हे शाळेत गुड टच बॅड टच प्रशिक्षण द्याला जात होते, या दरम्यान कट रचून हा सगळा प्रकार केला असल्याची तक्रार आहे.
सध्या अजित बडे हे सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्त आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











