Pune Crime News: पुणे: विद्येचे माहेरघर तसेच राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्याचं सामाजिक वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललं आहे. मागील काही वर्षात पुणे शहर आणि ग्रामीण भागातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चाकणजवळ पुणे-नाशिक महामार्गापासून नजीक असलेल्या समाधान बिअरबारच्या मागे एका व्यक्तीची काही अल्पवयीन मुलांनी क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
अरविंद रामप्रकाश राजे (वय 29 वर्ष) याला दोन अल्पवयीन मुलांनी एका क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. यावेळी अल्पवयीन आरोपींनी लाठी-काठीने हल्ला करत अरविंदला गंभीर जखमी केलं. यावेळी जखमी अवस्थेतच अरविंदला नजीकच्या विहिरीजवळ टाकून आरोपींनी पळ काढला होता. काही वेळाने अरविंद त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आला.
हे ही वाचा >> विम्याचे 53 लाख हडपण्यासाठी भाऊजीनेच मेहुण्याला संपवलं, सिनेमासारखाच रचला डाव, दुचाकी अपघातानंतर...
नेमकं प्रकरण काय?
अरविंद राजे याची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित प्रकरणाबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काल (30 एप्रिल) दुपारच्या वेळी घडली. हत्या झालेला अरविंद राजे आणि आरोपी हे बिअरबारच्या मागील भागात मद्यपान करत होते. त्यावेळी अचानक अरविंदने अल्पवयीन मुलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचं पर्यावसन हे हाणामारीत झालं. ज्यामध्ये अरविंदचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली. ज्यानंतर अवघ्या काही तासात अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली.
हे ही वाचा >> पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्वीस्ट, 'त्या' आरोपींच्या वकिलाचे पोलिसांवरच धक्कादायक आरोप
घटनेबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ आणि इतर कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी घटनास्थळी एक दुचाकी पडलेली आढळून आली होती. त्याच दुचाकीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यात आला.
पोलिसांनी अरविंदचा मृतदेह मिळताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला.
ADVERTISEMENT
