Reel Star chetan deolkar kidnapping case : सोशल मीडियावर चिनी बेटिंग ॲप्सचा प्रचार करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याचा प्रकार सुरू असताना, त्याविरोधात जनजागृती करणाऱ्या 28 वर्षीय कंटेंट क्रिएटर चेतन देवळकर यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेतन गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्या ‘रिलेट विथ चेतन’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चिनी बेटिंग ॲप्सची पोलखोल करणारे व्हिडिओ तयार करत होते. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स अशा ॲप्सचा प्रचार करून तरुणांना जाळ्यात ओढत असल्याचा आरोप करत त्यांनी त्याविरोधात सातत्याने रील्स बनवल्या. मात्र याच मोहिमेमुळे त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 26 जुलै रोजी सकाळी घडली असून बेटिंग ॲप्सच्या विषयावर चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांना पवईतील पंचकुटीर परिसरात बोलावण्यात आले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 25 वर्षीय तरुणाचा विवाहित महिलेवर जीव जडला, लग्नाला नकार देताच केलं भयानक कांड
"तू आमच्या बेटिंग ॲप्सविरोधात व्हिडिओ का बनवतोस?"
चेतन घटनास्थळी पोहोचताच काही जणांनी त्यांना जबरदस्तीने एका एसयूव्ही कारमध्ये बसवले. कारच्या पुढील आणि मागील सीटच्या मधोमध त्यांना अक्षरशः कोंबून ठेवण्यात आले. मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर एका आरोपीने त्यांच्या गळ्यावर पाय ठेवला, तर दुसऱ्याने सुरा दाखवत पोटात भोसकण्याची धमकी दिली. "तू आमच्या बेटिंग ॲप्सविरोधात व्हिडिओ का बनवतोस? जाहिरात करायची असेल तर कर, पण आमच्या विरोधात का जातोस?" असा जाब विचारत आरोपींनी त्यांना तब्बल 12 तास मारहाण केल्याचा आरोप आहे. अखेर जीव वाचवण्यासाठी यापुढे अशा प्रकारचे रील्स बनवणार नसल्याचे सांगितल्यानंतर रात्री सुमारे 11.35 वाजता त्यांना कळंबोली येथे रस्त्यावर सोडून आरोपी पसार झाले.
हेही वाचा : Personal Finance: डायमंड म्हणजे Investment की Luxury? खरेदीपूर्वी जाणून घ्या सत्य
चेतन यांना फोन करून धमकीही दिल्याचा आरोप
या घटनेमागील वाद काही महिन्यांपूर्वीच सुरू झाला होता. चेतन यांनी चिनी बेटिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सविरोधात सातत्याने रील्स तयार केल्या होत्या. त्यामध्ये पुण्यातील प्रतीक शिंदे याचाही समावेश होता. प्रतीक बेटिंग ॲप्सचा प्रचार करत असल्याचा आरोप असून, चेतन त्याच्या रील्सची पोलखोल करत होते. पाच ते सहा महिन्यांपूर्वी अनिकेत नावाच्या व्यक्तीने चेतन यांना फोन करून धमकीही दिल्याचे सांगितले जाते. मात्र चेतन यांनी त्यानंतरही त्यांची मोहीम सुरूच ठेवली. याच रागातून प्रतीकने चेतन यांच्या अपहरणाचा कट रचल्याचा आरोप या प्रकरणात समोर आला आहे.
मारहाणीमुळे जखमी झालेल्या चेतन यांनी प्रथम वैद्यकीय उपचार घेतले आणि त्यानंतर थेट पवई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पश्चिम क्षेत्र-3 चे डीसीपी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सर्वप्रथम विक्रोळी येथून यश बाबरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संपूर्ण नेटवर्कवर कारवाई करत पुण्याचा प्रतीक शिंदे, साताऱ्याचा अनिकेत गोडसे आणि पुण्याचा समीर कुचेकर उर्फ एस.के. या चौघांना अवघ्या 24 तासांत अटक केली. या अपहरणात आणखी तीन अज्ञात आरोपी सहभागी असल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच या कटामागे चिनी बेटिंग ॲप्सशी संबंधित कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT












