Crime News: दोन्ही बहिणींनी पैसे कमवण्याचा एक भलताच मार्ग स्विकारला. या दोन्ही बहिणी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करायच्या एकदा त्यांनी कुटुंबातील सदस्यांचा विश्वास मिळवला की चोरी करून गायब व्हायच्या. या बहिणींचा कहाणी वाचून तुम्ही थक्कच व्हाल.
ADVERTISEMENT
दिल्लीतील नोएडा पोलिसांनी गेल्या बऱ्याच वर्षांपासून मोलकरीण म्हणून काम करून त्याच घरांतून चोरी करणाऱ्या दोन बहिणींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास 88 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मामुनी जना उर्फ मोनी आणि आशा उर्फ मोनी यादव अशी आरोपी महिलांची नावे समोर आली आहेत. दोन्ही बहिणी पश्चिम बंगालच्या मूळ रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून त्या नोएडामध्ये राहत होत्या.
शहरात चोरीच्या घटना वाढल्यानंतर, विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक सूत्रांची माहिती आणि मोबाईल सर्व्हिलांस मदतीने अखेर पोलिसांनी दोन संशयित महिलांचा शोध घेतला. चोरी केल्यानंतर त्या महिला पश्चिम बंगालला पळून गेल्या असल्याचं तपासात दिसून आलं. आरोपींच्या शोधात पोलीस पथक पश्चिम बंगालला पोहोचलं आणि मेदिनीपूर जिल्ह्यात छापा टाकून दोन्ही बहिणींना अटक करण्यात आली.
मोलकरीण म्हणून काम करत घरात चोरी
पोलीस चौकशीत दोन्ही आरोपी महिलांनी सांगितलं की ते घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करायचे. सुरुवातीला, त्या घरात चांगलं काम करून कुटुंबियांचा विश्वास संपादन करायच्या आणि नंतर जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा त्या सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तूंची चोरी करायच्या. चोरी झाल्यानंतर, संशय येऊ नये म्हणून त्या घरकामासाठी त्याच घरात पुन्हा जात नव्हत्या. त्या महिला चोरी केलेले दागिने वितळवून रस्त्यावर भेटलेल्या लोकांना विकायच्या.
हे ही वाचा: तीन मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध! गर्भात प्रियकराचं बाळ अन् महिलेचा 'तो' हट्ट, अखेर घडलं भयानक...
सोन्याचे दागिने अन् रोख रक्कम चोरली
त्यातील एका महिलेने पोलिसांकडे कबूल केलं की तिने सेक्टर 12 मधील एका घरातून दागिने चोरले होते आणि त्यातील काही दागिने विकून 3 लाख मिळवले. तसेच, दुसऱ्या महिलेने सांगितलं की, तिने 9 ऑक्टोबर रोजी सेक्टर 49 मधील एका घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. चोरी झाल्यानंतर, ती दिवाळीनंतर तिच्या पतीसोबत पश्चिम बंगालला निघून गेली.
तब्बल 88 लाख रुपयांची जप्ती
या प्रकरणी सेक्टर-24 पोलिसांनी पेंडेंट, चेन, मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, हिऱ्यांचे दागिने आणि 1,54,810 रुपये रोख जप्त केले. तसेच, सेक्टर-49 पोलिसांनी सोन्याची बिस्किटे, बांगड्या आणि 1,34,500 रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली. अशा पद्धतीने, एकूण सुमारे 88 लाख रुपयांची जप्ती करण्यात आली. दोन्ही बहिणींना अटक करण्यात आली असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT











