UP Crime News : उत्तर प्रदेशातील कौशंबी जिल्ह्यात 12 दिवसांपूर्वी महामार्गाच्या कडेला एका पेटीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या अघोरी हत्याकांडात पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. आरोपी आधीच विवाहित होता आणि त्याने मृत प्रेयसीशी दुसरे लग्न केले होते. जेव्हा तिने त्याला आपल्या घरी नेऊन कुटुंबासोबत ठेवण्यासाठी दबाव टाकला, तेव्हा आरोपीने कट रचून तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह पेटीत भरून महामार्गावर फेकून दिला होता. 15 एप्रिल 2026 रोजी कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणपूर नॅशनल हायवे 2 वर एक संशयास्पद पेटी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पेटी उघडल्यानंतर पोलिसांना साधारण 30 वर्षीय मोनी वर्मा या महिलेचा मृतदेह सापडला, जी मूळची अमेठी जिल्ह्यातील रहिवासी होती.
ADVERTISEMENT
दुसरी पत्नी घरात राहण्याचा हट्ट धरू लागल्याने रचला हत्येचा कट
फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवालात महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी पथके तयार करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व्हिलन्सच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. 27 एप्रिल रोजी कोखराज पोलिसांनी वाहन तपासणी दरम्यान एका संशयास्पद कारला थांबवले. कारमध्ये बसलेला मुख्य आरोपी पती हर्ष खियानी उर्फ बिट्टू आणि त्याचा साथीदार यश गुप्ता यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, दोघांनीही हत्येची कबुली दिली. चौकशीत हर्षने सांगितले की, मृत मोनी त्याची दुसरी पत्नी होती आणि तो तिला गेल्या तीन वर्षांपासून ओळखत होता. त्याने घरच्यांना न सांगता तिच्याशी मंदिरात लग्न केले होते आणि तो तिच्यासोबत कानपूरमधील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता.
हेही वाचा : मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलिसांनी 24 तासात कसा लावला छडा?
पतीने स्टॉलने गळा आवळला आणि साथीदाराच्या मदतीने मृतदेह फेकला
हर्ष खियानीने पोलिसांना सांगितले की, त्याची पहिली पत्नी त्याच्या आई-वडिलांसोबत दबौली येथे राहते. मोनी वर्मा गेल्या काही दिवसांपासून त्याला आपल्या घरी नेण्यासाठी आणि तिथेच राहण्यासाठी दबाव टाकत होती. हर्षने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती. तिला घरी नेले असते तर पहिल्या पत्नीशी भांडण झाले असते आणि समाजात बदनामी झाली असती, या भीतीपोटी त्याने तिला वाटेतून हटवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने बाजारातून एक मोठी पेटी, गोळ्या आणि पॉलिथीन खरेदी केले. 15 एप्रिल रोजी संधी मिळताच त्याने तिला बेडवर पाडले आणि तिच्याच स्टॉलने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पेटीत भरला आणि यश गुप्ताला पैशांचे आमिष दाखवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत मागितली.
पुरावे नष्ट करण्यासाठी बॅग झुडपात फेकली; पोलीस तपासात आरोपी गजाआड
दोन्ही आरोपींनी महिलेचा मृतदेह असलेली पेटी गाडीत ठेवून महामार्गाच्या कडेला आणून फेकली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी मोनी वर्माची हँडबॅग थोड्या अंतरावर असलेल्या झुडपांमध्ये फेकून दिली होती. मात्र, तांत्रिक तपास आणि खबरींकडून मिळालेल्या माहितीमुळे पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले. हर्षने आपल्या दुसऱ्या लग्नाचे गुपित जगासमोर येऊ नये म्हणून इतके टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. सध्या दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात धाडण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास पूर्ण करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा दुहेरी संकट, वादळ वारं सुटणार, 'या' जिल्ह्यांचं अवघड होणार
ADVERTISEMENT











