Badaun : Badaun : चिमुकल्यांवर वस्तऱ्याने वार, जागेवरच केलं ठार; बदायूत रक्ताचा सडा

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. काल (19 मार्च) रात्री साजिद आणि जावेद नावाच्या तरूणांनी आयुष (13) आणि अहान (6) या निरागस मुलांची घरात घुसून हत्या केली. धारदार वस्तऱ्याने गळा चिरून निरपराधांची हत्या केली.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

• 05:32 PM • 20 Mar 2024

follow google news

Budaun Double Murder Case : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बदायूमध्ये दुहेरी हत्याकांडामुळे (Double Murder Case) खळबळ उडाली आहे. काल (19 मार्च) रात्री साजिद आणि जावेद नावाच्या तरूणांनी आयुष (13) आणि अहान (6) या निरागस मुलांची घरात घुसून हत्या केली. धारदार वस्तऱ्याने गळा चिरून निरपराधांची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी साजिदने मृत मुलांच्या आईला सांगितले की, 'आज मी माझं काम पूर्ण केलं आहे.' एफआयआरमध्ये हे नमूद करण्यात आलं आहे. (Uttar Pradesh Budaun Double Murder Case Salon barber kills two minor brothers)

हे वाचलं का?

मृत मुलांचे वडील विनोद कुमार यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 'साजिद आणि जावेद 19 मार्च रोजी घरात घुसले होते. साजिदने माझ्या पत्नीकडे पैसे मागितले होते. त्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याचं सांगत तो गच्चीवर गेला. तिथे त्याने आयुष आणि अहान यांच्यावर वस्तऱ्याने वार करून त्यांची हत्या केली. तिसऱ्या मुलावरही हल्ला करण्यात आला मात्र तो यातून वाचला. 

विनोद कुमार यांनी एफआयआरमध्ये पुढे लिहिले, 'जेव्हा साजिद आणि जावेद गच्चीवरून खाली येत होते, तेव्हा माझ्या पत्नीला त्यांच्या हातात रक्ताने माखलेला वस्तरा दिसला. घरातून बाहेर पडताना तो म्हणाला की आज मी माझं काम पूर्ण केलं आहे.

हे सर्व पाहिल्यानंतर पत्नी घाबरली आणि तिने गच्चीवर धाव घेतली. तिथे मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. या दरम्यान साजिदने संधी साधून तिथून पळ काढला.' 

कोण आहेत आरोपी साजिद आणि जावेद?

एफआयआरमध्ये विनोद कुमार यांनी सांगितले की, 'साजिद त्याचा भाऊ जावेदसोबत त्यांच्या घरासमोर सलूनचं दुकान चालवतो. मंगळवारी (19 मार्च) सायंकाळी सातच्या सुमारास साजिद आपल्या भावासोबत (जावेद) घरी आला. त्यावेळी पत्नी (संगीता देवी), आई (मुन्नी देवी) आणि तीन लहान मुलं आयुष (13), पियुष (9) आणि अहान (6) घरात होते.

घरात घुसल्यानंतर आरोपी साजिदने संगीताला पत्नीची डिलिव्हरी होणार असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी रात्री 11 वाजताची वेळ डिली आहे असं म्हणत संगीताकडे 5 हजार रूपये मागितले. यावेळी साजिदचा भाऊ जावेद हा दुचाकीसह बाहेर उभा होता. संगीताने पैसे देण्याबाबतचा विषय काढताच साजिदने मधला मुलगा पियुष याला गुटखा आणण्यासाठी बाहेर पाठवले.

नंतर अस्वस्थ वाटत असल्याचं सांगून साजिद गच्चीवर गेला. त्याने लहान मुलगा अहानलाही सोबत नेले. त्यानंतर आरोपी साजिदने मोठा मुलगा आयुषला पाणी आणण्यास सांगितले आणि इतक्यात भाऊ जावेदला घरात बोलावले.'

गच्चीवर रंगला रक्तरंजीत खेळ

विनोद कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'अशा प्रकारे साजिद, जावेद आणि दोन्ही मुले (आयुष, अहान) गच्चीवर गेले. पत्नी पैसे घेऊन बाहेर येताच साजिद आणि जावेद पायऱ्यांवरून उतरताना दिसले. साजिदच्या हातात रक्ताने माखलेला वस्तरा होता. संगीताला पाहताच तो म्हणाला, 'आज मी माझं काम पूर्ण केलं आहे. हे पाहून संगीताने घाबरून आरडाओरडा केला यावेळी परिसरातील लोक जमा झाले.

त्यानंतर संगीता वरच्या मजल्यावर गेली असता दोन्ही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांचा मृत्यू झाला होता. तेवढ्यात तिसरा मुलगा (पियुष) गुटखा घेऊन आला. यानंतर जावेदने पियुषवरही हल्ला केला, त्याच्या हाताला वस्तऱ्याने गंभीर दुखापत झाली. मात्र, तो वाचला. साजिद आणि जावेद यांच्याशी कोणतंही वैर नव्हतं. आम्हाला माहित नाही दोघांनी मिळून आमच्या मुलांची का हत्या केली.' असं मृत मुलांच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली आहे.

पोलिस अधिकारी या प्रकरणाबाबत काय म्हणाले?

बदायू दुहेरी हत्याकांडप्रकरणी जिल्ह्याचे एसएसपी आलोक प्रियदर्शी म्हणाले, 'आरोपी साजिद हा पीडित कुटुंबाच्या घरासमोर सलूनचं सामान ठेवायचा. त्याचं त्यांच्या घरी जाणं-येणंही होतं. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता त्याने पीडित कुटुंबाच्या घरात जाऊन गच्चीवर खेळणाऱ्या दोन मुलांवर हल्ला करून त्यांची हत्या केली.

या थरारक प्रकरणानंतर आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. पोलिसांनी नाकाबंदी करून मारेकरी साजिदला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून प्रत्येक बाजूने तपास केला जात आहे.'

एका आरोपीचा एन्काउंटर तर दुसरा फरार

दुहेरी हत्याकांड प्रकरणात साजिदसह त्याचा भाऊ जावेदलाही आरोपी ठरवण्यात आले आहे. पोलिसांनी साजिदचा एन्काउंटर केला असून आता जावेदचा शोध सुरू आहे. जावेदच्या शोधात पोलीस संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपी साजिदकडून मुलांची हत्या केलेले हत्यार जप्त केले आहे.

    follow whatsapp