शासकीय निवासस्थानी गरोदर महिलेची निर्घृण हत्या, 'त्या' रात्री काय घडलं?

मुंबई तक

• 07:33 AM • 02 Nov 2026

देवरिया येथील शासकीय निवासस्थानात एका महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हत्येतील मुख्य आरोपीला पोलीस चकमकीत गोळी लागली आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गरोदर महिलेची निर्घृण हत्या

point

कोणी दिली सुपारी?

Crime News : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रुद्रपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सरकारी निवासस्थानात 25 ऑक्टोबरच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली. येथे राहणाऱ्या गुडिया विश्वकर्मा या गरोदर महिलेची गळा आवळून आणि हातोड्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीवरून हुंडा बळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये पती, दीर, जाऊ, सासू आणि नणंद यांच्यासह इतरांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी 27 ऑक्टोबरच्या सकाळी एका मोठ्या कारवाईत मुख्य आरोपीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

तीन लाखांची सुपारी

पोलीस तपासात या हत्येमागील एक अत्यंत भयानक कट समोर आला आहे. गोरखपूरच्या गगहा भागातील रहिवासी असलेल्या सत्य प्रकाश यादव याने आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून गुडियाच्या हत्येचा कट रचला होता. या कामासाठी त्याने राम आशिष यादव आणि त्याचा साथीदार नरेश यांना 3 लाख रुपयांची सुपारी दिली होती. ही हत्या करण्यापूर्वी राम आशिषने 2.5 लाख रुपये रोख घेतले होते. 25 ऑक्टोबरच्या रात्री या आरोपींनी घरात घुसून गुडियाची हत्या केली आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नणंद पौर्णिमा हिने स्वतः 'डायल 112' वर फोन करून घटनेची माहिती दिली होती.

हे ही वाचा : वहिनी गच्चीवर गेली अन् दीरानं साधला डाव, आठ महिन्यानंतर हादरवून टाकणारं प्रकरण उघड

आरोपी गोळीबारात जखमी

देवरियाचे पोलीस अधीक्षक (SP) अजित आर. शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी रुद्रपुर पोलीस ठाण्याचे पथक नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग केला असता त्यांची दुचाकी घसरली आणि ते खाली पडले. खाली पडल्यानंतरही त्यांनी पोलिसांवर पुन्हा गोळीबार केला. पोलिसांनी आत्मरक्षणासाठी केलेल्या जबाबाबी गोळीबारात मुख्य आरोपी राम आशिष यादव याच्या डाव्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला.

हे ही वाचा : फ्री फायरवरुन भयंकर 'गेम', अल्पवयीन मुलगी तरुणाच्या जाळ्यात अडकली, पुढं काय घडलं?

फरार आरोपीचा शोध सुरु

जखमी अवस्थेत राम आशिष यादव याला अटक करून उपचारासाठी रुद्रपुरच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याचा दुसरा साथीदार नरेश हा अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाने देवरिया आणि गोरखपूर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या गुन्ह्यातील इतर आरोपींची आणि कौटुंबिक सदस्यांची कसून चौकशी करत आहेत.