Crime News : तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. पतीचा अडसर दूर करण्यासाठी एका 25 वर्षीय महिलेने तिच्या दोन प्रियकरांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे हा संपूर्ण कट उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या दोन्ही प्रियकरांना बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
तलावात आढळा मृतदेह
गुम्माडी काशिराम (वय 26) असे मृत तरुणाचे नाव असून तो हानमजीपेठ गावचा रहिवासी व रोजंदारी मजूर होता. 23 ऑक्टोबरच्या रात्री गावाच्या वेशीवर असलेल्या एका तलावात त्याचा मृतदेह तरंगताना आढळला होता. सुरुवातीला काशिरामच्या वडिलांच्या तक्रारीवरून बांसवाडा पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, शवविच्छेदन अहवालातून काशिरामचा बुडून नाही तर गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा : "मी गेल्यानंतर दुसरं लग्न कर", इंजिनिअरच्या पत्नीची मुलाला घेऊन 18 व्या मजल्यावरुन उडी
ट्रॅक्टर चालक अन् मजुरासोबत अनैतिक संबंध
यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाचा रोख बदलला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान काशिरामची पत्नी गुम्माडी सविथा (25) हिचे गावातीलच चिंताकिंडी रामू (26) या मजुराशी आणि पसुपुल संतोष (25) या ट्रॅक्टर चालकाशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या अनैतिक संबंधांना पती काशिराम विरोध करत असल्याने, सविथाने दोन्ही प्रियकरांच्या सोबतीने त्याला कायमचे वाटेतून हटवण्याचा कट रचला.
हे ही वाचा : सत्ता, संपत्ती अन् 40 व्हिला! IAS-IPS दाम्पत्य ACB च्या रडारवर, नक्की प्रकरण काय?
'अशी' केली हत्या
23 ऑक्टोबरच्या रात्री आरोपींनी काशिरामला दारू पिण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. तो प्रचंड नशेत असताना संतोषने त्याचे हात घट्ट पकडून ठेवले आणि रामूने नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी व हा अपघात वाटावा म्हणून मृतदेह तलावात फेकून दिला. पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन आणि हत्येत वापरलेले साहित्य जप्त केले असून न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT












