IAS Officer Corruption : राजस्थानच्या प्रशासकीय वर्तुळात एक प्रचंड मोठा आणि धक्कादायक गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण सनदी वर्तुळात खळबळ उडाली आहे. उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका सनदी अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका खाजगी कंपनीला अवाजवी फायदा पोहोचवला आणि त्या बदल्यात स्वतःसह संपूर्ण कुटुंबाच्या नावे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता लाटल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई सुरू केली असून, संशयित IAS अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी, वरिष्ठ IPS अधिकारी प्रशाखा माथुर यांच्यावर राज्य सरकारने तत्काळ कारवाई करत दोघांचीही APO (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत) अंतर्गत रवानगी केली आहे.
ADVERTISEMENT
घोटाळा कसा केला?
मिळालेल्या माहितीनुसार, शिखर अग्रवाल यांनी आपल्या शासकीय कार्यकाळात 'अनंता' ब्रँडअंतर्गत रिसॉर्ट्स चालवणाऱ्या 'गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला विविध नियमांमध्ये अवाजवी सूट दिली. रिसॉर्ट बांधकामाच्या अटी शिथिल करणे, आवश्यक प्रमाणपत्रांची सखोल तपासणी न करताच मंजुरी देणे आणि कंपनीला अनुकूल ठरणारे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करणे, अशा अनेक मार्गांनी राज्य सरकारचे मोठे आर्थिक नुकसान करून या कंपनीला थेट फायदा पोहोचवण्यात आला. या बदल्यात, सप्टेंबर 2023 ते मार्च 2026 या अवघ्या अडीच वर्षांच्या काळात अग्रवाल कुटुंबाने सुरसंड, बुझडा (उदयपूर) आणि अजबगड (अलवर) येथील दोन अनंता रिसॉर्ट्समध्ये तब्बल 40 कॉटेजेस आणि व्हिला खरेदी केले. या संपत्तीची कागदोपत्री किंमत सुमारे 6.16 कोटी रुपये दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा ही किंमत अत्यंत कमी असल्याचा संशय आहे.
हे ही वाचा : "मी गेल्यानंतर दुसरं लग्न कर", इंजिनिअरच्या पत्नीची मुलाला घेऊन 18 व्या मजल्यावरुन उडी
कोणा-कोणाच्या नावे संपत्ती?
या व्यवहारातील सर्वात चक्रावून टाकणारी बाब म्हणजे, खरेदी केलेल्या या सर्व मालमत्ता अग्रवाल, त्यांच्या पत्नी, दोन मुले आणि सासू-सासऱ्यांच्या नावे नोंदवण्यात आल्या. संपत्ती खरेदी केल्यानंतर ती पुन्हा त्याच कंपनीला लीजवर (भाडेतत्त्वावर) देण्यात आली, ज्यातून या कुटुंबाला दरवर्षी तब्बल 1.8 कोटी रुपयांचे नियमित उत्पन्न मिळत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, प्राथमिक तपासात या भ्रष्टाचाराचे आणि पदाच्या गैरवापराचे प्रथमदर्शनी ठोस पुरावे हाती आले आहेत. राज्य सरकारने याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17A अंतर्गत विस्तृत आणि सखोल तपासाला अधिकृत मंजुरी दिली आहे.
हे ही वाचा : वहिनीच्या प्रेमात आकंठ बुडाला, भावाला संपवायला गेला पण झालं भलतंच, नेमकं काय घडलं?
मोठे मासे गळाला लागणार?
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, ACB आता शिखर अग्रवाल यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता (Disproportionate Assets) जमा केल्याच्या अंगानेही तपास करत आहे. या भ्रष्ट साखळीत अधिकारी, कंपनीचे संचालक आणि मध्यस्थांची नेमकी भूमिका काय होती, याचा शोध घेतला जात आहे. प्रशासकीय पदाचा वापर करून स्वतःचे खिसे भरण्याच्या या लाजीरवाण्या प्रकरणाने राजस्थानच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटवले असून, ACB च्या अंतिम तपास अहवालानंतर यात आणखी किती मोठे मासे गळाला लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












