Crime News : क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. मात्र या खेळामुळे अनेकदा वाद-विवाद होतात. काही वाद इतक्या टोकाला जातात की त्यातून हत्यादेखील झाल्याची अनेक प्रकरणं घडली आहेत. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादात डोक्यात बॅट घालून एका 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव परिसरातील ही घटना आहे. भूपेंद्र सिंह असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भारताचे ऑईल टँकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणण्यास इराणची परवानगी, एस जयशंकर यांच्या 'फोनाफोनी'ने निघाला मार्ग
सामन्यादरम्यान वाद अन् डोक्यात घातली बॅट
मिळालेल्या माहितीनुसार, सूरजपाल सिंह यांचा मुलगा भूपेंद्र सिंह ३ मार्च रोजी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळ सुरू असतानाच खेळाडूंमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी रागाच्या भरात अमित सिंह नावाच्या तरुणाने भूपेंद्रच्या डोक्यावर बॅटने प्रहार केला. या हल्ल्यात भूपेंद्र जागीच कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी लखनऊच्या केजीएमयू रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
उपचारादरम्यान मृत्यू
गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या भूपेंद्रचा बुधवारी (11 मार्च) रात्री मृत्यू झाला. त्याच्या निधनाची बातमी गावात समजताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. भूपेंद्रच्या मागे आई सावित्री, भाऊ संदीप आणि अर्चना व कुसुमा या दोन बहिणी असा परिवार असून, तरुण मुलाच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी आधीच आरोपी अमित सिंह आणि त्याचे आजोबा नन्हेलाल यांच्याविरोधात कलम 308 अन्वये जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
ग्रामस्थांमध्ये आक्रोश
पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला हा गुन्हा खुनाच्या प्रयत्नाचा म्हणून नोंदवण्यात आला होता, मात्र आता भूपेंद्रचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस कारवाईत बदल करण्यात येणार आहे. पोस्ट मार्टम अहवाल आणि प्राप्त पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्यात सदोष मनुष्यवधाचे कलम वाढवण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून गावात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











