Satara Lok Sabha Election: शरद पवारांनीही उडवली कॉलर, उदयनराजेंविरोधात पुन्हा उतरले मैदानात!

रोहित गोळे

29 Mar 2024 (अपडेटेड: 29 Mar 2024, 03:30 PM)

Lok Sabha Election 2024: सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार हे आता स्वत: मैदानात उतरले आहेत. भाजपकडून उदयनराजे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात असल्याने पवार नेमकं कोणाला उमेदवारी देणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

साताऱ्यात शरद पवारांची नवी रणनिती

साताऱ्यात शरद पवारांची नवी रणनिती

follow google news

Satara Lok Sabha Election 2024 Sharad Pawar vs Udayanraje Bhosale: सातारा: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी आता हळूहळू उमेदवार हे जाहीर होऊ लागले आहेत. राज्यातील महत्त्वाच्या पक्षांनी आपले काही उमेदवार हे जाहीर केले आहेत. मात्र, काही मतदारसंघ असे आहेत की, जेथील उमेदवार हे अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यापैकीच सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Lok Sabha Constituency) आहे. हीच जागा राखण्यासाठी आता स्वत: शरद पवार (Sharad Pawar) हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे जर साताऱ्यातून पुन्हा उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळालं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. (lok sabha election 2024 sharad Pawar again entered the satara lok sabha election field against bjp leader udayanraje bhosale)

हे वाचलं का?

साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघातून नेमका कोणता उमेदवार द्यावा यासाठी आज (29 मार्च) शरद पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी थेट उदयनराजेंसारखीच कॉलर उडवून ते साताऱ्याच्या लढाईसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. 

पाहा उदयनराजेंबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले... 

साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना सवाल विचारण्यात आला की, उदयनराजेंनी उमेदवारीसाठी तुमच्याशी काही संपर्क केला आहे का? 
यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'उदयनराजेंनी काहीही संपर्क केलेला नाही..' त्याचवेळी शरद पवारांनी कॉलर देखील उडवली.

'मतदारांना काही सांगायची गरज नाही.. साताऱ्याचा मतदार हा अत्यंत समंजस आहे आणि तो योग्य निर्णय घेईल. उदयनराजे हे भाजपमध्ये आहेत. आता ते भाजपमध्ये आहेत. मी पाहिलंय.. सर्व सातारकरांनी त्यांचं सर्व रस्त्यांवर स्वागत केलंय.' असा उपरोधिक टोला पवारांनी यावेळी लगावला. 

'सातारा जिल्हाचा अनुभव आणि पक्षाच्या निवड समितीने असं सांगितलं की, मी साताऱ्याला जाऊन येथील कानोसा घ्यावा.  श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती. पण वैद्यकीय कारणामुळे श्रीनिवास पाटील हे निवडणूक लढणार नाही. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा आम्ही घेतला आहे. त्यावेळी दोन-तीन सहकाऱ्यांची नावं इथल्या सहकाऱ्यांनी सुचवली आहेत. एक-दोन दिवसांमध्ये साताऱ्याचा उमेदवार हा निश्चित केली आहेत.' असं पवारांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवार कोणता उमेदवार देणार याबाबत जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा पवार म्हणाले की, 'आमच्यासमोर जी नावं आली त्यात शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजीत पाटणकर आणि श्रीनिवास पाटील ही होती.' ज्याबाबत पुढील 2-3 दिवसात निर्णय जाहीर केला जाईल असं पवारांनी सांगितलं. 

हे ही वाचा>> Pune Lok Sabha 2024 : 'वंचित' वसंत मोरेंना पुण्यातून देणार लोकसभेची उमेदवारी?

'ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढायची आहे. त्याचं कारण राज्यामध्ये भाजपविरुद्ध असलेले जे घटक आहे त्यांचा संच तयार झाला आहे. त्यात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस तसंच डाव्या आणि प्रागतिक विचाराचे जे पक्ष आहेत.. हे आमच्या सगळ्यांसोबत आहे. त्यामुळे कोणतेही निर्णय घ्यायचे असतील तर ते सगळ्यांनी मिळून घ्यायला हवे.' 

'सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस आमचासोबत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विचाराने पुढे चाललो आहोत. दुसऱ्यांबाबत आम्ही विचार करत नाही. आम्ही जे ठरवू ते निवडणूक लढवतील. सातारा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच जागा आहे आणि इथे राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल.' असंही पवार यावेळी म्हणाले.

उदयनराजेंच्या उमेदवारीवर भाजपकडून अद्यापही शिक्कामोर्तब नाही!

दरम्यान, शरद पवार हे साताऱ्यासाठी रणनिती आखत असताना दुसरीकडे उदयनराजे भोसले हे भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड आग्रही आहे. ज्यासाठी त्यानी दिल्ली दौराही केला होता आणि अमित शाहांची भेटही घेतलेली.  मात्र, भाजपने अद्याप तरी या जागेबाबत नेमका निर्णय जाहीर केलेला नाही. 

2019 विधानसभा निवडणुकीआधी उदयनराजेंनी नुकतंच निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे येथे विधानसभेसोबतच पोटनिवडणूक लावण्यात आली होती. याच पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. जो भाजपसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेचं खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं.

हे ही वाचा>> Lok Sabaha 2024 : 'या' एका जागेमुळे ठाकरे-शिंदेंची वाढली कटकट!

मात्र, आता पुन्हा एकदा उदयनराजे हे लोकसभा तिकीटाची मागणी करत आहेत. खरं तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडे आहे. त्यामुळेच याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार ही जागा भाजपला देण्यास तयार आहे. अशावेळी उदयनराजे यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे इथे पुन्हा शरद पवार विरूद्ध उदयनराजे असा थेट सामना पाहायला मिळू शकतो.

 

 

    follow whatsapp