KGF fame harish rai passes away : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते हरीश राय यांचे गुरुवारी (दि. 6) निधन झाले. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हरीश राय गेल्या काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही दु:खद बातमी दिली आणि हरीश राय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
ADVERTISEMENT
कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
शिवकुमार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, “कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक हरीश राय यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. ते कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘ओम’, ‘हलायम’, ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अप्रतिम अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि देव त्यांच्या परिवाराला व जवळच्या व्यक्तींना या दु:खाचा सामना करण्याची शक्ती देवो.”
हरीश राय यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आणि आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांनी टीव्ही आणि नाटक क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनेक कलाकारांनी म्हटले की, “हरीश रायसारखे साधे पण महान कलाकार क्वचितच पाहायला मिळतात, ज्यांनी साधेपणा आणि अभिनय दोन्ही एकत्र जापासले.”
मीडिया रिपोर्टनुसार, हरीश राय काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. ते साऊथ सुपरस्टार यशसोबत ‘केजीएफ 1’ च्या पहिल्याच दृश्यात दिसले होते. जरी त्यांची भूमिका छोटी होती, तरीही त्यांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठरला.
केजीएफच्या शूटिंगदरम्यान सहन केली वेदना
एका मुलाखतीत हरीश राय यांनी सांगितले होते की ‘केजीएफ’च्या शूटिंगदरम्यान ते घशाच्या कॅन्सरने त्रस्त होते. उपचारांमुळे त्यांच्या घशाला सूज आली होती, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक दाढी वाढवली होती, जेणेकरून ती सूज दिसू नये. हरीश राय यांनी यूट्यूबर गोपी गौडरू यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “परिस्थिती माणसाला महान बनवू शकते किंवा त्याच्याकडून सर्व काही हिरावून घेऊ शकते. नशिबापासून कोणीही पळू शकत नाही. मी गेली तीन वर्षे कॅन्सरशी झुंज देत आहे. ‘केजीएफ’मध्ये मी लांब दाढी ठेवली होती, कारण आजारामुळे मानेत सूज आली होती. सुरुवातीला माझ्याकडे शस्त्रक्रियेसाठी पैसे नव्हते, म्हणून ती पुढे ढकलली. मी वाट पाहत होतो की चित्रपट प्रदर्शित होतील आणि मला काही पैसे मिळतील. पण आता मी कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात आहे आणि तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











