‘त्यांच्याही गोष्टी बाजारात येतील’; IT ची छापेमारी संपताच अभिजित पाटलांचा इशारा

मुंबई तक

• 04:06 AM • 29 Aug 2022

-गणेश जाधव, उस्मानाबाद धाराशिव साखर कारखान्याचे आणि डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यालयासह कारखान्यातील आयकर विभागाची झाडाझडती तीन दिवसानंतर संपली. अभिजित पाटील यांच्या पंढरपूर येथील घर, कारखाना आणि उस्मानाबाद येथील कारखान्यावर ३ दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर आता अभिजित पाटील यांनी विरोधकांना इशारा दिलाय. आयकर विभागाच्या कारवाईवर अभिजित पाटील काय म्हणाले? आयकर विभागाची […]

Mumbaitak
follow google news

-गणेश जाधव, उस्मानाबाद

हे वाचलं का?

धाराशिव साखर कारखान्याचे आणि डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यालयासह कारखान्यातील आयकर विभागाची झाडाझडती तीन दिवसानंतर संपली. अभिजित पाटील यांच्या पंढरपूर येथील घर, कारखाना आणि उस्मानाबाद येथील कारखान्यावर ३ दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर आता अभिजित पाटील यांनी विरोधकांना इशारा दिलाय.

आयकर विभागाच्या कारवाईवर अभिजित पाटील काय म्हणाले?

आयकर विभागाची छापेमारी संपल्यानंतर आज अभिजित पाटील यांनी मौन सोडलं. “आयकर विभागाला चुकीची माहिती दिली गेली. कारखाने कुठून एका मागून एक आले? इतका पैसा कुठून आला?, असं विचारलं गेलं. त्यावर आम्ही सांगितलं की, काही कारखाने हे कर्ज घेऊन भाडेतत्वावर घेतले आहेत. त्यामुळे त्याला भांडवलाची गरज नाही. जे काही होते ते सगळे रेकॉर्डवर होते. धाडीत कुठेही अवैध पैसा, सोनं किंवा इतर मालमत्ता सापडली नाही. त्यांना दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली व काही कागदासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यात ती दिली जातील”, अशी माहिती अभिजित पाटील यांनी आयटीच्या छापेमारीनंतर दिली.

आयकरची कारवाई हे विरोधकांचं षडयंत्र -अभिजित पाटील

“मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक लढावली. त्यात मला यश आलं. त्यामुळे माझा वारू रोखला पाहिजे, यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले”, असा आरोप अभिजित पाटील यांनी केला आहे.

Osmanabad: देशात पहिल्यांदा ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या धाराशिव साखर कारखान्यावर ‘आयटी’ची धाड

अभिजित पाटील : ‘मला विठ्ठल पावला, आता उजळ माथ्याने फिरणार’

“विठ्ठल कारखाना माझ्याकडे शेतकरी सभासदांनी दिला. त्यानंतर आयकर विभागाच्या कारवाईत काही न सापडल्यानं मी आता उजळ माथ्यानं फिरू शकतो. त्यामुळे माझ्यावर ‘विठ्ठल’ या कारवाईने कोपला नाही, तर विठ्ठल पुन्हा एकदा पावला. मी जे काही केलं. कमावलं ते प्रामाणिकपणे केलं”, अशा शब्दात अभिजित पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

“राजकीय विरोधातून हे सगळं केलं गेलं. विरोधकांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. विरोधकांचं नाव सगळ्यांना माहित आहे, ते योग्य वेळी जाहीर करू. जे झालं आहे, ते चांगलं झालं. येणाऱ्या काळात मी चौपट ताकदीनं काम करेल आणि या भागातील लोकांना रोजगार, उसाचा प्रश्न मार्गी लावेल.”

उस्मानाबाद, सोलापूरमध्ये IT च्या धाडी : आमदार कैलास पाटील यांच्या भाच्याच्या उद्योगामध्ये झाडाझडती

IT Raid : ‘आता माझं आव्हान पेलून दाखवा’

“या कारवाईतून मला बळ मिळालं आहे. विरोधकांनी जे आव्हान दिलं होतं, ते मी पेललं आहे. त्यांना यातून काही शक्य झालं नाही. आता विरोधकांनी माझं आव्हान पेलून दाखवावं. त्यांच्या काही गोष्टी आता बाजारात येतील”, असा इशारा अभिजित पाटील यांनी विरोधकांना दिला.

“विठ्ठल कारखाना जिंकल्यावर खऱ्या अर्थानं काही जणांना माझी भीती वाटू लागली. बहुजन मराठा समाजाची मूलं अशी प्रगती करताना मैदानात अडवता येत नसतील, तर अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते चुकीचं आहे”, असंही अभिजित पाटील म्हणाले.

    follow whatsapp