पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका शाळेत अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही घटना घडल्यानंतर काही तासांच्या आता आरोपीला पकडण्यात आलं आहे. मंगेश पदमुळू असं या आरोपीचं नाव आहे. शिवाजीनगर भागातल्या एका शाळेत बुधवारी 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर ही मुलगी या संपूर्ण प्रकाराने घाबरली. मात्र तिला धीर देत तिच्याकडून आरोपीचं वर्णन पोलिसांनी ऐकलं त्यावरून रेखाचित्र तयार केलं आणि या आरोपीला गुरूवारी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
 
शिवाजीनगर येथील एका शाळेत बुधवारी दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास एक मुलगी शाळेमध्ये गेली होती. त्यावेळी 40 वर्षीय अनोळखी व्यक्ती तुला मी ओळखतो असे सांगून शाळेच्या बाथरूम नेऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.या घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास तुला बघतो,अशी धमकी दिली.त्यानंतर त्या मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली.त्या मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पीडित मुलीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.आता तिची तब्येत ठीक असून आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पीडित मुलीच्या मदतीने तिने सांगितलेल्या वर्णनानुसार, एक रेखाचित्र तयार केले आहे. या रेखाचित्रमधील व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्यात यावे,असे आवाहन देखील करण्यात आले. तर या सर्व घडामोडी दरम्यान या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उलटले.
विद्येच्या माहेरघरात कोवळ्या कळ्या असुरक्षित, पुण्यात ११ वर्षांच्या मुलीवर शाळेतच बलात्कार
या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी शहर आणि आसपासच्या भागात पथके रवाना केली होती. त्याच दरम्यान शाळा परिसरातील सीसीटीव्हीमधून आरोपीचा शोध घेण्यात आला.तेव्हा एक आरोपी संशयितरित्या तिथे फिरताना दिसला. आरोपी ज्या मार्गाने जात होता.त्यानुसार शोध घेतल्यावर शिवाजीनगर भागातील पांडवनगर मधील एका दारूच्या दुकानातून आरोपी मंगेश पदमुळू या आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच,त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
घडला प्रकार जेव्हा पोलिसांना समजला तेव्हा त्यांनी या मुलीकडून अज्ञात आरोपीची माहिती घेतली. त्यावरून या आरोपीचं रेखाचित्र तयार केलं. रेखाचित्र आणि सीसीटीव्ही फुटेज याची तपासात बरीच मदत झाली, त्यामुळे आरोपीला पकडता आलं असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT











