भगतसिंह कोश्यारींच्या विधानावर अजित पवार संतापले! मोदींना म्हणाले, ‘वेळ आलीये’

पुण्यातल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच भगतसिंह कोश्यारी यांना सुनावल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा राज्यपालांविरोधात आक्रमक झालेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांनंतर अजित पवारांनी मोदींकडे तक्रार केली असून, राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी अप्रत्यक्षपणे केलीये. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेतील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत’, असं विधान केलं होतं. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:15 AM • 20 Nov 2022

follow google news

पुण्यातल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच भगतसिंह कोश्यारी यांना सुनावल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा राज्यपालांविरोधात आक्रमक झालेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांनंतर अजित पवारांनी मोदींकडे तक्रार केली असून, राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी अप्रत्यक्षपणे केलीये.

हे वाचलं का?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेतील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत’, असं विधान केलं होतं. या विधानामुळे राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत भगतसिंह कोश्यारी हटवण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही आक्रमक भूमिका घेत मोदींकडे विधानाची दखल घेण्याची मागणी केलीये.

कोश्यारींचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान, बावनकुळेंनी मांडली भाजपची भूमिका

अजित पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानावर काय म्हणाले?

“महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील”, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

भगतसिंह कोश्यारींना दिला राज्यपालपद सोडण्याचा सल्ला

“महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

PM मोदींना माझी हात जोडून विनंती, कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती

राज्यपालांची मोदींकडे तक्रार, सद्बुद्धी लाभावी म्हणून केली प्रार्थना

“राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे. त्याचबरोबर “राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना!”, असा टोला अजित पवारांनी भगतसिंह कोश्यारींना लगावला आहे.

राज्यपाल कोश्यारींची अजित पवारांनी केली दुसऱ्यांदा तक्रार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची अजित पवारांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानांकडे तक्रार केलीये. यापूर्वी त्यांनी पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात मोदींसमोरच राज्यपालांच्या विधानांवर बोट ठेवलं होतं. “मला पंतप्रधानांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की, महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या काही व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्यं केली जात आहेत. ते महाराष्ट्राला परवडणारे नाही. त्यामुळं याकडेही लक्ष द्यावं,” असं म्हणत अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती.

    follow whatsapp