'जय गुजरात', पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांची घोषणा!

पुण्यातील एका कार्यक्रमात अमित शाह यांच्या समोर भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली आहे. ज्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलं आहे.

Eknath Shinde Jai Gujarat

Eknath Shinde Jai Gujarat

मुंबई तक

04 Jul 2025 (अपडेटेड: 04 Jul 2025, 05:56 PM)

follow google news

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (4 जुलै) पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान "जय गुजरात" अशी घोषणा दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे. हा प्रसंग सोशल मीडियावर तातडीने व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

अमित शाहांचं प्रचंड कौतुक आणि भाषणाच्या शेवटी 'जय गुजरात' घोषणा

पुण्यातील गुजराती समाजच्या एका स्थानिक संघटनेने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रमुख पाहुणे होते. तर त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील सहभागी झाले होते.

हे ही वाचा>> "अहंकारी लोकांचा फणा 2024 च्या निवडणुकीत जनतेनं ठेचला आणि..", उपमुख्यमंत्री शिंदेचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान!

त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान अमित शाह यांचं प्रचंड कौतुक केलं. एवढंच नव्हे 2022 साली महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं त्यावेळी अमित शाह हे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे होते असंही शिंदे यावेळी म्हणाले. एवढंच नव्हे तर भाषणाच्या शेवटी शिंदेंनी अमित शाह यांचं कौतुक करण्यासाठी एक शेर देखील म्हटला. 

यानंतर भाषण संपवताना मात्र एकनाथ शिंदेंनी जय गुजरात असा जाणीवपूर्वक उल्लेख केला. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. 

पाहा भाषणात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले...

'मला स्वत:ला अनुभव आहे.. 2022 तुम्हाला माहिती आहे. राज्यात तुम्ही पाहिलं होतं. दुकानं बंद होती, मंदिरं बंद होती सगळं बंद होतं.. सगळे स्पीड ब्रेकर होते. पण त्यावेळी सामन्य जनतेचं सरकार आणण्याची आवश्यकता होती. त्यावेळी मी जरूर सांगेन, गर्वाने सांगेन.. मोदीजींचं मार्गदर्शन तर होतंच. पण अमितभाई माझ्या पाठिशी डोंगराप्रमाणे उभे होते.'

हे ही वाचा>> 'राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं बघवत नाही..', मेळाव्या आधी राऊतांनी साधला निशाणा पण टार्गेटवर नेमकं कोण?

'बघा.. ते काम सोप्पं होतं का? सरकार तर चालत होतं ना.. पण जेव्हा राज्याच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा अशी पावलं उचलावी लागतात. म्हणून अमितभाईंना खूप धन्यवाद देतो.. कारण की, त्यांनी पाठिंबा दिला, मोदींजींनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे आमचं डबल इंजिनचं सरकार वेगाने पळत आहे.' 

'मी एवढंच म्हणेन.. अमितभाई तर महाराष्ट्राचे जावई आहेत. देशाचे गृहमंत्री आहेत. पण त्यांच्या होम मिनिस्टर या आपल्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी आनंदाने नांदतात. दोन्ही भाषा..' 

'महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी विकास, उद्योग आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नेहमीच देशाला दिशा दाखवली आहे.' 

'जाता-जाता मी अमित भाईसाठी एक शेर ऐकवतो..' 

आपके बुलंद इरादो से चट्टाने भी डगमगाती है...
दुश्मन का चीज है.. तुफान भी अपना रुख बदल देता है.. 

आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है.. 
आपके नाम से हर शख्स आदब से झुक जात है... 

'धन्यवाद.. जय हिंद, जय महाराष्ट्र जय गुजरात!' असं भाषण एकनाथ शाह यांनी यावेळी केलं आहे.
  
दरम्यान, आता एकनाथ शिंदेंच्या या घोषणेनंतर विरोधक यावर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp