Election Commission of India Announced By Elections of Baramati and Rahuri Vidhansabha : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशातील चार प्रमुख राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केलीये. याशिवाय महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथे एप्रिल महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून, सर्वच ठिकाणची मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या निवडणुका पारदर्शक करण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला असून, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव सुटणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम असा
30 मार्चला अधिसुचना निघणार
6 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
7 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होणार
9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार
23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार
बंगालमध्ये दोन टप्प्यांत तर आसाम, केरळ आणि पुडुचेरीमध्ये एकाच दिवशी रणसंग्राम
पाच राज्यांच्या या महासंग्रामात पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत, म्हणजेच 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. आसाम, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये मात्र 9 एप्रिल रोजी एकाच दिवशी सर्व जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, सर्व राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होतील. या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण 17.4कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून, 824 विधानसभा जागांसाठी सुमारे 2.19 लाख मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणुकीच्या या मोठ्या मोहिमेसाठी तब्बल 25 लाख निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











