Mumbai Crime News : बोरिवली पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 15 च्या भाजप नगरसेविका जिज्ञासा निकुंज शाह यांचा एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये नगरसेविका एका रहिवाशाच्या खासगी दुकानात आपल्या समर्थकांसह जबरदस्तीने घुसताना आणि दुकानातील माल रस्त्यावर फेकून देताना स्पष्टपणे दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, दुकानामध्ये देवघर असूनही जिज्ञासा शाह आणि त्यांच्या साथीदारांनी चपला घालून आत प्रवेश केल्याचा आरोप करण्यात येतोय. सनातन धर्म आणि धार्मिक मूल्यांचा हा अपमान असल्याचे मानत जनतेने या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ही खासगी मालमत्ता असल्याचे पोलिसांनी घटनास्थळी स्पष्ट करूनही नगरसेविकेने कायद्याला जुमानले नाही आणि स्वतः तोडफोड सुरू केली.
ADVERTISEMENT
दुकानात घुसून कपडे बाहेर फेकले, नगरसेविकेचा प्रताप
या व्हायरल क्लिपमधील शक्तीप्रदर्शन आता एका मोठ्या राजकीय वादाचे कारण बनले आहे. पीडित व्यक्तीने आपल्या मालमत्तेवर स्पष्ट कायदेशीर हक्क असल्याचे सांगितले असूनही, गेल्या दोन दिवसांपासून त्याला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओच्या स्वरूपात उघड पुरावा समोर असूनही, आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेवर कारवाई करण्याऐवजी भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी बाळगलेल्या मौनामुळे जनतेचा रोष अधिकच वाढत आहे. लोकप्रतिनिधींनीच जर पोलिसांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून सामान्य नागरिकांना त्रास दिला आणि धार्मिक भावनांचा अनादर केला, तर सामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ नेतृत्वाचा हा प्रतिसाद कायद्याच्या राज्याऐवजी 'गुंडगिरीला' दिलेला मूक पाठिंबा असल्याची चर्चा सध्या बोरिवलीत रंगली आहे.
मंदिराच्या नावाखाली व्यवसायाचा आरोप; नगरसेविका जिज्ञासा शाह यांचे स्पष्टीकरण
या वादावर आपली बाजू मांडताना नगरसेविका जिज्ञासा निकुंज शाह यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, स्थानिक दुकानदार आणि काही अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी मंदिराचा वापर करून अनधिकृत व्यवसाय केला जात असल्याची तक्रार त्यांच्याकडे केली होती. "आम्ही तिथे गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला विचारणा केली, परंतु त्याने योग्य उत्तर दिले नाही. केवळ इथून कपडे नेतो आणि व्यवसाय करणार नाही एवढेच त्याने सांगितले. मात्र, तिथला एक दरवाजा उघडण्यास सांगितल्यावर त्याने टाळाटाळ केली. सुमारे 15 मिनिटांनंतर जेव्हा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा तिथे देवाच्या मूर्तीसमोर कपड्यांचा खच पडलेला होता," असे स्पष्टीकरण जिज्ञासा शाह यांनी दिले आहे. मंदिराच्या पवित्र्याचा गैरवापर रोखण्यासाठीच आपण तिथे गेलो होतो, असा दावा त्यांनी केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शाळेतला सिलिंडर चोरुन रात्री शेतात झोपले, सकाळी गावकऱ्यांच्या तावडीत सापडले, एकजण फरार
ADVERTISEMENT











