kerala minister kb ganesh kumar : केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारमधील एका बड्या मंत्र्याशी संबंधित खासगी वाद आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्याचे परिवहन मंत्री के. बी. गणेश कुमार आणि त्यांच्या पत्नी बिंदू मेनन यांच्यातील 'बेडरूम ड्रॅमा'मुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बिंदू मेनन यांनी आपल्या पतीवर परस्त्रीशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला, ज्याने केवळ सरकारची प्रतिमा डागाळली गेली. मात्र, दोन दिवस चाललेल्या या हाय-प्रोफाईल वादानंतर बिंदू मेनन यांनी अचानक आपली तक्रार मागे घेण्याची घोषणा केली. निवडणुकीच्या रणधुमाळीत समोर आलेल्या या प्रकरणामुळे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारची गोची झाली असून, विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बीड : माणसं आहेत की सैतान? घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत गावाबाहेर अत्याचार, नंतर चावडीवर बांधून ठेवलं
धक्कादायक आरोप आणि 48 तासांचा हाय-व्होल्टेज ड्रामा
या प्रकरणाची सुरुवात बिंदू मेनन यांच्या एका दाव्याने झाली, ज्यामध्ये त्यांनी कोल्लम येथील आपल्या राहत्या घरी पतीला एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचे म्हटले होते. त्यांनी या घटनेचे पुरावे म्हणून फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि चालकाने त्यांच्याशी धक्काबुक्की करून मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. संतापलेल्या बिंदू यांनी मदतीसाठी 112 हेल्पलाइनवर कॉल केला होता, परंतु मंत्र्यांच्या दबावामुळे पोलिसांनी घरात येऊन कारवाई करण्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला. यादरम्यान घरातील गोंधळ पाहून शेजारीही जमा झाले होते. मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला मागच्या दाराने पळवून लावण्यास मदत केल्याचा आरोप होत असतानाच, त्या महिलेची ओळख अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही. दोन दिवस सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती आणि सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता.
तक्रार मागे घेण्याचा निर्णय आणि राजकीय दबाव
घटनेनंतर 48 तासांच्या आत बिंदू मेनन यांनी अचानक आपली भूमिका बदलली, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. "प्रत्येक माणसाकडून चुका होऊ शकतात, हे आमचे पती-पत्नीमधील वैयक्तिक प्रकरण असून मला आता कोणतीही तक्रार करायची नाही," असे म्हणत त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी स्पष्ट केले की, त्या आपल्या पतीवर प्रेम करतात आणि हा वाद आता आपसात मिटला आहे. मात्र, विरोधी पक्षांनी हा दावा फेटाळून लावत, हा निर्णय राजकीय दबावातून घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. सरकार आपल्या मंत्र्याला वाचवण्यासाठी पीडितेवर दबाव टाकत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तक्रार मागे घेतली असली तरी घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन तपास करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
वादग्रस्त इतिहास आणि निवडणुकीवर होणारे परिणाम
मंत्री गणेश कुमार हे अनेकदा वादात सापडले असून, अशाच प्रकारच्या आरोपांमुळे त्यांना यापूर्वीही पद गमवावे लागले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी बिंदू मेनन यांच्याशी विवाह केला आणि पुन्हा एकदा राजकारणात आपले स्थान भक्कम केले. मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते राहिलेले गणेश कुमार सध्या केरळ काँग्रेस (बी) चे अध्यक्ष असून एलडीएफ सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद विरोधी पक्षांसाठी आयते कोलीत ठरले आहे. पत्नीने हा विषय संपवल्याचे म्हटले असले तरी, जनतेच्या दरबारात या प्रकरणाचे पडसाद कसे उमटतात आणि याचा फटका निवडणुकीत बसतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











