मुंबई: ज्या घरात भाषण म्हणजे कला मानली जाते, ज्या नेत्याचं प्रत्येक भाषण व्हायरल होतं, त्याच घरातील पुढच्या पिढीच्या नेत्याचं भाषण अर्ध्यातच थांबलं तर? मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेमकं हेच घडलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे काही क्षणांसाठी भाषण विसरले. त्यानंतर ते चक्क स्टेजवरून निघून गेले पण काही वेळाने पुन्हा येऊन त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. पण त्या काही सेकंदांनी सोशल मीडियावर मात्र अनेक मीम्स, टोमणे आणि चर्चेला उधाण आलंय.
ADVERTISEMENT
अमित ठाकरे भाषण विसरले अन् स्टेजवरून खाली उतरले...
मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमित ठाकरे उपस्थित होते. भाषण सुरू असताना ते काही क्षण थांबले. पुढे काय बोलायचं हे आठवत नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर ते व्यासपीठावरून खाली उतरले. काही वेळाने पुन्हा स्टेजवर आले आणि आपलं उर्वरित भाषण पूर्ण केलं.
हे ही वाचा>> "मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं
राजकारणात अशा घटना काही नवीन नाहीत. अनेक अनुभवी नेतेही कधी नोट्स पाहतात, कधी भाषणात अडखळतात, तर कधी शब्द चुकतात. मात्र अमित ठाकरेंच्या बाबतीत ही घटना वेगळी ठरली. कारण त्यांची तुलना थेट त्यांचे वडील राज ठाकरे यांच्याशी केली जाते.
मग काय सोशल मीडियावरही ट्रोलर्सची फौज आपसूकच उभी राहिली... कुणी म्हणालं, "राज ठाकरेंच्या घरात भाषणाचं Wi-Fi थोडावेळ डिस्कनेक्ट झालं."
तर दुसऱ्याने लिहिलं, "Pause घेतला नाही... Buffering सुरू झाली." असे एक ना अनेक मीम अवघ्या काही क्षणात तयार झाले.
राज ठाकरेंच्या भाषणाशी तुलना
खरं पाहिलं तर या घटनेत जितकी चर्चा अमित ठाकरेंची झाली, तितकीच चर्चा राज ठाकरेंच्या भाषण कलेचीही झाली. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावी वक्त्यांपैकी एक मानले जातात. त्यांची तयारी, शब्दांवरचं प्रभुत्व, विनोदबुद्धी, संदर्भ आणि स्टेजवरील आत्मविश्वास यामुळे त्यांची भाषणं आजही मोठ्या प्रमाणावर पाहिली जातात.
हे ही वाचा>> "दुसऱ्यांनाही आई असते, हे तुमच्या पक्षातील लोकांना...", राज ठाकरेंचं पीएम मोदींना प्रत्युत्तर
त्यामुळे साहजिकच लोकांची अपेक्षा होती की अमित ठाकरेंकडूनही तितक्याच सहज आणि प्रभावी शैलीचं भाषण पाहायला मिळेल. जेव्हा तसं घडलं नाही, तेव्हा सोशल मीडियाने तुलना करण्याची एकही संधी सोडली नाही. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सार्वजनिक व्यासपीठावर हजारो लोकांसमोर बोलणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक वक्ता कधी ना कधी अडखळतो. अनेक मोठ्या नेत्यांच्या भाषणातही असे क्षण आले आहेत.
अमित ठाकरे यांनी काही वेळाने पुन्हा स्टेजवर येत भाषण पूर्ण केलं. त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे की, चूक झाली खरी पण त्यांनी कार्यक्रम सोडून न जाता भाषण पूर्ण केलं, ही देखील नोंद घेण्यासारखी बाब आहे.
सोशल मीडिया हा आजच्या काळातील सर्वात वेगवान आणि अत्यंत संवेदनशील विषय झालाय. कारण इथे काही सेकंदांचा व्हिडिओ काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. कधी तुमचं प्रचंड कौतुक होतं तर कधी प्रचंड ट्रोलिंग.. अमित ठाकरे यांच्या बाबतही काहीसं तसंच झालं आहे.
ADVERTISEMENT












