abhijeet dipke on gen z thoughts : मुंबई Takने छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद साधला. या विशेष मुलाखतीत जेनझी पिढीबद्दल समाजात तयार झालेली प्रतिमा, ग्रामीण भागातील तरुणांचे वास्तव आणि त्यांच्यासमोरील प्रश्न यावर चर्चा झाली. जेनझी म्हटले की सोशल मीडियावर रील्स बनवणारे, स्टाईल करणारे किंवा 'फोमो'सारखे शब्द वापरणारे तरुण एवढीच मर्यादित व्याख्या केली जाते. मात्र, ही व्याख्या अत्यंत संकुचित असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले. त्यांच्या मते, जेनझीची व्याप्ती केवळ शहरांतील सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांपुरती मर्यादित नसून ग्रामीण भारतातील लाखो तरुणही त्याच पिढीचा भाग आहेत.
ADVERTISEMENT
1997 नंतर जन्मलेले तरुण म्हणजे जेनझी - अभिजीत दिपके
मुलाखतीदरम्यान जेनझीची व्याख्या आणि त्यांच्याविषयीचे गैरसमज यावर चर्चा करताना अभिजीत दिपके म्हणाले की, 1997 नंतर जन्मलेले तरुण म्हणजे जेनझी. त्यापैकी अनेकांनी शिक्षण पूर्ण केले असूनही त्यांना रोजगार मिळालेला नाही. पदवीधर असूनही मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार असल्याचे त्यांनी नमूद केले. संसदेत जेनझीची भाषा वापरणे किंवा त्यांच्या शब्दांचा वापर करणे म्हणजे त्या पिढीपर्यंत पोहोचणे नव्हे, तर त्यांच्या वास्तविक प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जेनझी ही केवळ शहरी किंवा डिजिटल जगात वावरणारी पिढी नसून ग्रामीण भागातील तरुणही तितकेच जागरूक असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Personal Finance: महिन्याला 2 हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांनी कोणती चूक टाळावी?
'अनेक तरुणांच्या विवाहातही अडचणी निर्माण होत आहेत'
ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव सांगताना अभिजीत दिपके यांनी स्वतःच्या कुटुंबातील उदाहरणे दिली. त्यांच्या नातेवाईकांपैकी अनेकजण आजही शेतमजुरी, बांधकाम क्षेत्रातील काम किंवा इतर मजुरीची कामे करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते स्वतः परदेशात शिक्षण घेतल्यामुळे लोकांना आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वेगळी वाटते, पण प्रत्यक्षात तसे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या एका भावाने पदवी घेतल्यानंतरही बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम स्वीकारले असून कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे किती कठीण आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्रामीण भागात मुलगा काय करतो हा प्रश्न विवाहाच्या वेळी सर्वप्रथम विचारला जातो आणि रोजगार नसल्यामुळे अनेक तरुणांच्या विवाहातही अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाबाबतही अभिजीत दिपकेंनी चिंता व्यक्त केली. आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या कारणामुळे अनेक कुटुंबांना मुलींना पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बारावीनंतर किंवा काही ठिकाणी दहावीनंतरच मुलींचे लग्न लावून देण्याची प्रथा अजूनही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलांनाही पुढे शिक्षण घेण्याऐवजी मजुरी, शेती, ट्रॅक्टर चालवणे किंवा वीटभट्टीवर काम करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. हे वास्तव आपण स्वतः गावात पाहिल्याचा उल्लेख करत त्यांनी जेनझी पिढीच्या प्रश्नांकडे केवळ सोशल मीडियाच्या चष्म्यातून न पाहता ग्रामीण भारताच्या वास्तवातून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
ADVERTISEMENT












