उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गुवाहाटी येथील प्रशिक्षण दौऱ्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा दौरा प्रशिक्षणासाठी होता की पिकनिक, असा प्रश्न उपस्थित केला जात असून पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 65 लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
नगरसेवकांसोबत त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनीही प्रवास केल्याचा आरोप होत असल्याने या दौऱ्याभोवती वादाचे सावट निर्माण झाले आहे. तसेच या दौऱ्यात जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे सुद्धा होते, त्यांच्या या दौऱ्यात काय काम होतं? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे. या अभ्यास दौऱ्यातून नगरसेवक उल्हासनगरमध्ये नेमकं काय करणार? असेही प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.
गुवाहाटी दौऱ्यावरून नगरसेवकांवर टीका
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने 22 ते 26 जुलै दरम्यान गुवाहाटी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. 76 पैकी 71 नगरसेवकांनी या प्रशिक्षणासाठी संमती दिल्यानंतर त्यांच्या प्रवास आणि निवासाचा संपूर्ण खर्च उल्हासनगर महापालिकेने उचलला. मात्र, प्रत्येक नगरसेवकांसाठी विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेलमधील निवास, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह सुमारे 74 हजार 720 रुपयांचा खर्च अपेक्षित होता. दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनेक नगरसेवक पत्नी, आई, मुले आणि इतर नातेवाईकांसह गुवाहाटी गाठल्याचा आरोप होत आहे.
हे ही वाचा>> विरोधी पक्षांना यश येत नाही, मग सीजेपीच्या आंदोलनालाच यश का आलं? अभिजीत दिपकेंचं उत्तर ऐकाच
उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना नेहमी एकमेकांचा विरोधात भांडत असतात मात्र, या गुवाहाटी दौऱ्यात दोन्ही पक्ष एकत्र आले. आता या अभ्यास दौऱ्याचा उल्हासनगरवासियांसाठी कशा पद्धतीने उपयोग करतात? तसेच ह्याचा फायदा शहरात कसा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, या संपूर्ण प्रकरणामुळे पालिकेच्या निधीचा वापर, प्रशिक्षण दौऱ्याची पारदर्शकता आणि नगरसेवकांसोबत गेलेल्या कुटुंबीयांच्या खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल... एकदम ओके!
विशेष म्हणजे, शिवसेनेत फूट पडल्यानंतर बंडखोर आमदार ज्या आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामी होते. तिथेच आमदार शाहजी बापू पाटील यांनी काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल... एकदम ओके! हे वाक्य गुवाहाटीहून आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना वापरले होते, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्याच हॉटेलमध्ये नगरसेवकांचा मुक्काम झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे देखील या विमानप्रवासात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा>> 'भाजपमध्ये ये अन्यथा काही करुन टाकू', ऑफर, धमक्या, पहिल्यांदा गौप्यस्फोट
दरम्यान, महापालिकेच्या प्रभारी सचिव तथा उपआयुक्त दीपाली चौगुले यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात गुवाहाटी येथे 60 ते 70 नगरसेवक प्रशिक्षणासाठी गेले होते, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नेमकी किती नगरसेवक या दौऱ्यात सहभागी झाले, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिकेने शहरातील प्रलंबित विकासकामे, खड्डेमय रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करून एवढा खर्च का केला, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
भाजपची गटनेते राजेश वधारिया यांनी सांगितले की, 'महापालिकेत पहिल्यांदा 37 नगरसेवक हे नवीन निवडून आलेले आहेत, त्यांना ट्रेनिंग देणे गरजेचे होतं, त्यामुळे आम्ही गुवाहाटीला जाऊन ट्रेनिंग घेऊन आलो. नगरसेवकांचे खर्च हे महापालिकेने केले आहे तर त्यांच्या कुटुंबीयांच्या खर्चा कुटुंबीयांनी स्वतः केला आहे. ट्रेनिंग अगोदर किंवा ट्रेनिंग नंतर कोणी रील बनवलं असेल तर त्यामध्ये मला काही चुकीच्या वाटत नाही. जोपर्यंत नवीन निवडून आलेल्या नगरसेवक नगरसेविकांना ट्रेनिंग दिलं जात नाही. तोवर त्यांना कसं कळणार की कशा पद्धतीने प्रभागाचे विकासकाम करायचे किंवा महासभेत मुद्दे कसे मांडायचे? जर याची माहिती नसेल तर ते जनतेचे काम कसे करणार, त्यामुळे त्यांना ट्रेनिंग गरजेचे आहे.' असा दावा करत त्यांनी या गुवाहाटी दौऱ्याचं समर्थन केलं.
ADVERTISEMENT












