Abhijeet Dipke chhatrapati sambhajinagar press conference : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी केलेली मागणी योग्य असल्याचे दिपके यांनी म्हटले. कॉकरोच जनता पार्टीला परदेशातून निधी मिळतो किंवा पक्ष बाहेरून चालवला जातो, असे आरोप केले जात असतील तर त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांवरच येते, असे ते म्हणाले. अशा प्रकारचे आरोप खरे असतील तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहमंत्र्यांचे हे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच 20 तारखेला जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय झाली नसावी, असे मत व्यक्त केले.
ADVERTISEMENT
भाजपात बलात्कार प्रकरणातील आरोपींना समर्थन दिले जात असल्याचा आरोप
पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्र्यांबाबतही दिपके यांनी भाष्य केले. प्रियंका गांधी यांनी संसदेत आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानाचा उल्लेख करत त्यांनी संबंधित क्लिप पाहिल्याचे सांगितले. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींविषयी केलेल्या कथित वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी देशाच्या शिक्षणमंत्र्यांवर टीका केली. अशा प्रकारच्या भूमिकेमुळे देशाला चुकीचा संदेश जात असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी सत्ताधारी पक्षावरही निशाणा साधत, त्यांच्या सरकारमध्ये गुन्हेगार आणि बलात्काराच्या आरोपींना समर्थन दिले जात असल्याचा आरोप केला. कुलदीप सेंगर आणि राम रहीम यांच्या संदर्भाचाही त्यांनी उल्लेख करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आजचे जे झी तरुण उद्या देश चालवणारे असतील - अभिजीत दिपके
कंगना राणावत यांच्याबाबत सुरू असलेल्या सोशल मीडियावरील चर्चेवरही अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर काही जण समर्थन करत आहेत तर काही जण ट्रोल करत आहेत, अशा वातावरणात तरुणांना लक्ष्य करून ट्रोल करण्याचा कोणालाही फायदा होणार नाही, असे त्यांनी सांगितले. 15 ते 28 वर्षे वयोगटातील युवक हेच पुढे जाऊन देशाचे नागरिक, मतदार आणि भविष्यात देश चालवणारे असतील, त्यामुळे त्यांना राजकीय किंवा वैचारिक भूमिकांवरून लक्ष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामान्य कुटुंबातील तरुणांना ट्रोल करून समाजात नकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाशिक पोलिसांनी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मोबाईल रेकॉर्डिंगसंदर्भात जारी केलेल्या एसओपीवरही दिपके यांनी आपली भूमिका मांडली. एखादी कृती रेकॉर्ड होण्याची भीती वाटत असेल तर संबंधितांनी स्वतःच्या वर्तनाचा विचार करावा, असे ते म्हणाले. त्यांच्या आंदोलनादरम्यान माध्यमांचे तसेच पोलिसांचे कॅमेरे सतत उपस्थित होते आणि त्याची कोणतीही भीती वाटली नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी एसओपी काढण्यापेक्षा संविधानाचे पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील पोलीस हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून संविधानानुसार काम करणारी यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले. जर संविधानापेक्षा एखाद्या राजकीय पक्षाचे आदेश पाळायचे असतील, तर खाकी वर्दी घालण्याचा अधिकार नसल्याची टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
ADVERTISEMENT












