संजय राऊत फिल्म बनवणार, संसदेतच घोषणा, भाषण करत असताना जोरदार राडा

मुंबई तक

31 Jul 2026 (अपडेटेड: 31 Jul 2026, 08:42 AM)

Sanjay Raut rajya sabha speech : राज्यसभेत संजय राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाषणादरम्यान 'लापता गृहमंत्री' नावाचा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

Sanjay Raut rajya sabha speech

Sanjay Raut rajya sabha speech

Google CTA

बातम्या हायलाइट

point

संजय राऊत फिल्म बनवणार, संसदेतच घोषणा

point

भाषण करत असताना जोरदार राडा

Sanjay Raut rajya sabha speech : राज्यसभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भाषणाची सुरुवात त्यांनी कवी पाश यांच्या ओळींनी केली. "सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नांचा मृत्यू होणे," असे सांगत त्यांनी देशातील लाखो युवकांची स्वप्ने संपुष्टात आली आहेत किंवा संपवली गेली आहेत, असा आरोप केला. 20 जुलै रोजी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधूर आणि पेललेट गनचा वापर करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. अनेक वरिष्ठ नेत्यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थी आंदोलनातून सुरू झाली, मात्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणीही उभे राहिले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

हेही वाचा : नागपूर: महिला क्रिकेटरनं गळफास घेत संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये 'ते' धक्कादायक कारण

'लापता गृहमंत्री' नावाचा चित्रपट बनवणार, संजय राऊतांची घोषणा 

यानंतर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. विद्यार्थ्यांची मागणी ही देशातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवण्याची असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री या आंदोलनापासून घाबरल्याचा आरोप केला. याचवेळी त्यांनी, मी एक 'लापता गृहमंत्री' नावाचा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली. "प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया देणारे आणि प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेणारे गृहमंत्री इतके मोठे आंदोलन झाले, विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, तरी एकही वक्तव्य करताना दिसले नाहीत", असंही ते म्हणाले. या विधानानंतर सभागृहात गदारोळ निर्माण झाला आणि सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा : 'कॉलेजचे 7 हजार विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह', हा दावा अन् सगळेच हादरले.. सरकारकडून स्पष्टीकरण जारी

देशाच्या शिक्षण व्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्याची गरज  - संजय राऊत 

सभागृहात सुरू झालेल्या गोंधळातही राऊत यांनी नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गळतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांसाठी नीट ही केवळ परीक्षा नसून त्यांच्या भवितव्याचा निर्णय करणारी प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या यंत्रणेतील अपयशामुळे ही व्यवस्था कोलमडत असल्याचा आरोप करत त्यांनी नव्या कायद्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिक्षा वाढवून प्रश्न सुटणार नाही, तर प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या स्तरापासून ते संपूर्ण व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. कुलगुरूंसारख्या महत्त्वाच्या पदांवर कोणत्या प्रकारच्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते, याबाबतही चिंता व्यक्त करत देशाच्या शिक्षण व्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सभापतींकडून वेळ संपल्याचे वारंवार सांगितले जात असतानाही संजय राऊत यांनी भाषण सुरूच ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावर सभापतींनी त्यांना अतिरिक्त वेळ दिल्याचे नमूद करत भाषण संपवण्यास सांगितले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री यांनी सर्व सदस्यांचा वेळ कमी करून कामकाज नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. उशिरापर्यंत कामकाज चालणार असल्याने सर्व सदस्यांनी संसदेच्या भोजनगृहात जाऊन भोजन करावे, अशी विनोदी टिप्पणीही त्यांनी केली. मात्र, त्याआधी संजय राऊत यांच्या "लापता गृहमंत्री" या चित्रपटाच्या घोषणेमुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली.