Abhijeet Dipke reaction on Gitanjali J Angmo sanatan statement : "विश्वगुरू असणं म्हणजे काय हे कोणी दाखवलं असेल, तर ते भारताच्या 'जेन झी'नं. त्यांनी सनातन धर्माचा फक्त प्रचार केला नाही, तो त्यांनी जगला आहे", असं वक्तव्य सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी केलं होतं. यासंदर्भात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची 'ती' कृती, शिवप्रेमींचा संताप VIDEO
धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय - अभिजीत दिपके
गीतांजली आंगमो यांचे मत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. "सीजेपीचा त्यांच्याशी त्या वक्तव्याच्या संदर्भात कोणताही संबंध नाही. धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे आणि तो तसाच राहायला हवा," असे ते म्हणाले. स्वतःचाही धर्म वैयक्तिक असल्याचे सांगताना त्यांनी कोणाच्याही धार्मिक श्रद्धेवर भाष्य करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे नमूद केले. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक धार्मिक मताचा संबंध संपूर्ण आंदोलनाशी जोडणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : 'विरोधी पक्षांचं आंदोलन लोकचळवळ बनू शकत नाही..' अभिजीत दिपकेंनी स्पष्टच सांगितलं
वैयक्तिक श्रद्धेचा संबंध आंदोलनाशी जोडता येणार नाही - दिपके
मुलाखतीदरम्यान दिपके यांना गीतांजली आंगमो यांनी आंदोलनाला "खऱ्या अर्थाने सनातन धर्म जगणारे" असे म्हटल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आंदोलनाचा मूळ उद्देश पुन्हा अधोरेखित केला. "आमचे आंदोलन हे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी होते. ते शिक्षण व्यवस्थेपुरतेच मर्यादित होते. कोणालाही आपला धर्म पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्या वैयक्तिक श्रद्धेचा संबंध आंदोलनाशी जोडता येणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान विविध प्रकारचे राजकीय आणि वैचारिक आरोप करण्यात आल्याचा उल्लेख करत दिपके म्हणाले की, पूर्वी राजकीय पक्षात काम केल्याचा अनुभव आंदोलनाला योग्य दिशेत ठेवण्यासाठी उपयोगी पडला. आंदोलनाला देशविरोधी किंवा अन्य कोणत्याही विचारसरणीशी जोडण्याचे प्रयत्न झाल्याचा दावा करत त्यांनी ते सर्व प्रयत्न फेटाळून लावल्याचे सांगितले. आंदोलन केवळ शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि लोकशाही पद्धतीने भूमिका मांडण्यासाठी असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. कोणत्याही धार्मिक चौकटीत आंदोलनाला अडकवण्याचा प्रयत्न स्वीकारार्ह नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचाही उल्लेख केला. आंबेडकरांना केवळ एका समाजापुरते मर्यादित करून पाहणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. देशाचे संविधान, महिलांचे अधिकार, शिक्षणाचा हक्क, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये डॉ. आंबेडकरांचे योगदान संपूर्ण देशासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे आपल्या चळवळीबाबत बोलताना त्यांनी भविष्यात "पॉलिटिकल प्रेशर ग्रुप" म्हणून काम करण्याची भूमिका मांडली. निवडणुकांनंतरही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये काळानुसार नवीन आंदोलने आणि नवीन नेतृत्व पुढे येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, कोणतीही व्यक्ती किंवा संघटना कायमस्वरूपी सर्व प्रश्न सोडवू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
ADVERTISEMENT












