‘मला तर शिव्या दिल्या पण माझ्या स्वर्गीय आईला सुद्धा.., आपल्या मुली अशी भाषा कशी बोलू शकतात?’, PM मोदींचा नवा Insta Reel

मुंबई तक

• 12:23 AM • 01 Aug 2026

PM Modi Gen Z Video: जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवर मोदींनी रात्री उशिरा Instagram वरून Gen Z ला संबोधित केलं. ‘मुलांना माफ करू इच्छितो, त्यांना शिक्षा नव्हे तर योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे’, असं मोदी म्हणाले.

i want to forgive children who abused me pm modi big message to gen z from Instagram reel over jantar mantar students protest

PM Modi

Google CTA

नवी दिल्ली: जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (31जुलै) रात्री उशिरा Gen Z ला संबोधित केलं. रात्री सुमारे 11 वाजल्यानंतर मोदींनी Instagram वर एक नवा रिल शेअर केला आणि त्यांनी या घटनेवर आपली भूमिका मांडली. त्यांनी संबंधित मुलांना माफ करण्याची इच्छा व्यक्त केली.

हे वाचलं का?

‘मला आणि माझ्या दिवंगत आईला शिव्या दिल्या’

पंतप्रधान मोदी रिलमध्ये म्हणाले की, ‘जंतर-मंतरवर जे काही घडलं ते देश आणि जगाने पाहिलं आहे. काही मुलांनी अतिशय आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेचा वापर केला. या वक्तव्यांमध्ये त्यांनी मला  आणि माझ्या दिवंगत आईला देखील  घाणेरड्या शिव्या दिल्या.’

‘मात्र, या घटनेकडे केवळ रागाच्या भावनेतून पाहण्याऐवजी मुलांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे’, असं मोदींनी म्हटलं.

‘लहान वयात चुका होतात, सुधारण्याची संधीही मिळते’

मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं की, ‘लहान वयात चुका होतात आणि त्या चुकांमधून सुधारण्याची संधीही मिळते. त्यामुळे या घटनेबाबत समाजात निर्माण झालेला आक्रोश आपण समजू शकतो’, असं त्यांनी सांगितलं.

‘पण मुलींकडून अशा प्रकारची भाषा वापरली जाणं हा आपल्यासाठी ‘कल्चरल शॉक’ असल्याचंही मोदींनी म्हटलं. 

‘त्यांना शिक्षा करण्यापेक्षा योग्य मार्ग दाखवा’

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना योग्य मार्ग दाखवण्यात यावा. या मुलांची गळाभेट देऊन त्यांना योग्य दिशा दाखवण्याची ही वेळ आहे.’

मोदींनी पुढे असंही सांगितलं की, ‘या मुलांना न्यायालयाच्या चकरा मारायला लावणं किंवा समाजात त्यांना त्रास देणं, यामुळे परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे आपण त्यांना माफ करू इच्छितो आणि समाजानेही ही भूमिका स्वीकारावी’, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. 

‘दात आणि जीभ’चं उदाहरण देत मोदींचा संदेश

आपली भूमिका स्पष्ट करताना मोदींनी दात आणि जीभ यांचं उदाहरण दिलं. ‘कधी कधी दाताखाली जीभ आल्याने जीभेला जखम होते आणि रक्तही निघतं. मात्र, त्यासाठी आपण दात तोडत नाही, कारण दातही आपलेच असतात आणि जीभही आपलीच असते’, असं मोदींनी सांगितलं.

‘याच भावनेतून या मुलांकडे पाहिलं पाहिजे’, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

‘ही मुलंही आपलीच आहेत’

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘ही मुलंही आपलीच आहेत आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणं हे आपलं काम आहे. गोंधळलेल्या किंवा चुकीच्या दिशेने गेलेल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणं कठीण असतं; मात्र कठीण कामं करण्याची गरज आहे’, असं त्यांनी सांगितलं.

मोदींनी Gen Z ला देशासाठी एकत्र पुढे येण्याचं, नवीन गोष्टी शिकण्याचं आणि स्वतःच्या चुकांमधूनही शिकण्याचं आवाहनही यावेळी केलं.

‘तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी झटतोय’

‘देश पुढे जात आहे आणि पुढेही जाणार आहे. त्यासोबतच तरुणांचंही पुढे जाणं निश्चित आहे’, असं मोदींनी म्हटलं.

‘तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी झटतोय’ असा संदेश देत त्यांनी तरुणांना आपल्या स्वप्नांसाठी पुढे जाण्याचं आवाहन केलं. देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याचं आवाहन करत मोदींनी शेवटी, ‘चुकांमधून शिका आणि पुढे चला’, असा संदेशही दिला.

जंतर-मंतरवरील घटनेची पार्श्वभूमी काय?

नीट पेपर लीकच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान रुचिका सिंह नावाच्या युवतीचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह आणि शिवराळ टिप्पणी करताना दिसल्याचा दावा करण्यात आला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. संबंधित प्रकरणात 25 वर्षीय रुचिका सिंहविरोधात नोएडामध्ये झिरो FIR दाखल करण्यात आली होती. या कारवाईवरून सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.