Mumbai News: गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रोजेक्टसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. हा प्रोजेक्ट मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणार असून या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला गती मिळणार असल्याचं समोर आलं आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामाला वेग मिळणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
नागरिकांसाठी दिलासाजनक बाब
हा प्रोजेक्ट मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा एक प्रमुख रस्ता ठरणार आहे. उत्तर मुंबईतील प्रवाशांसाठी याचा अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट फक्त वाहतूकीच्या दृष्टीनेच नव्हे तर महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या प्रोजेक्टमुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांना सुटका मिळवता येणार असल्याने ही दिलासाजनक बाब ठरली आहे.
वनाची जमीन महापालिकाकडे वळती...
खरंतर, प्रत्येकी 4.7 किमी अंतराच्या आणि 45.70 मी. रुंदीच्या जुळ्या बोगद्यासाठी आवश्यक असलेली 19.43 हेक्टर वनाची जमीन महापालिकेकडे वळती करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्यता मिळाली असून अभिजीत बांगर या अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी याची माहिती दिली.
हे ही वाचा: पुणेकरांसाठी गुड न्यूज.. मेट्रोबाबत मोठी बातमी, लवकरच 'या' स्टेशनवरून करता येणार प्रवास!
जुळ्या बोगद्याची निर्मिती
या प्रोजेक्टच्या 3 (अ) टप्प्यांतर्गत उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोडरीची बांधणी यांचा समावेश आहे. तसेच 3 (ब) मध्ये गोरेगाव मधील दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील 1.22 किमी लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा तसेच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किमी अंतराच्या आणि 45.70 मी रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे.
हे ही वाचा: 'जय गुजरात', पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांनी घोषणा!
पर्यायी वनीकरण योजना
हा बोगदा जमिनीखाली 20 ते 160 मी खोल भागात असणार आहे. प्रत्येकी 300 मी. अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. यासोबतच बोगद्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच प्रोजेक्टसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील कोणतीही झाडे आणि जमीन बाधित होणार नसल्याची काळजी घेण्यात येणार आहे. यासोबतच वन (संरक्षण आणि संवर्धन) नियम, 2023 नुसार पर्यायी वनीकरण योजना तयार करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
ADVERTISEMENT
