'जय गुजरात', पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांची घोषणा!
पुण्यातील एका कार्यक्रमात अमित शाह यांच्या समोर भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली आहे. ज्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (4 जुलै) पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान "जय गुजरात" अशी घोषणा दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे. हा प्रसंग सोशल मीडियावर तातडीने व्हायरल झाला आहे.
अमित शाहांचं प्रचंड कौतुक आणि भाषणाच्या शेवटी 'जय गुजरात' घोषणा
पुण्यातील गुजराती समाजच्या एका स्थानिक संघटनेने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रमुख पाहुणे होते. तर त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील सहभागी झाले होते.
हे ही वाचा>> "अहंकारी लोकांचा फणा 2024 च्या निवडणुकीत जनतेनं ठेचला आणि..", उपमुख्यमंत्री शिंदेचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान!
त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान अमित शाह यांचं प्रचंड कौतुक केलं. एवढंच नव्हे 2022 साली महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं त्यावेळी अमित शाह हे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे होते असंही शिंदे यावेळी म्हणाले. एवढंच नव्हे तर भाषणाच्या शेवटी शिंदेंनी अमित शाह यांचं कौतुक करण्यासाठी एक शेर देखील म्हटला.
यानंतर भाषण संपवताना मात्र एकनाथ शिंदेंनी जय गुजरात असा जाणीवपूर्वक उल्लेख केला. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.










