Amruta Fadnavis : “भिडे गुरूजींबाबत मला आदर, मात्र महिलांनी कसं जगावं हे कुणीही सांगू नये”

मुंबई तक

03 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. साम मराठी या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते तिला उद्देशून तू आधी टिकली लाव किंवा कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलेन असं उत्तर दिलं. यावरून महिला आयोगानेही संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता […]

Mumbaitak
follow google news

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. साम मराठी या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते तिला उद्देशून तू आधी टिकली लाव किंवा कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलेन असं उत्तर दिलं. यावरून महिला आयोगानेही संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे अमृता फडणवीस यांनी?

संभाजी भिडे गुरूजी यांच्याबाबत मला नितांत आदर आहे. ते हिंदुत्वाचा एक स्तंभ आहेत. मात्र मला व्यक्तीगत रित्या असं वाटतं की कुठल्याही महिलेने कसं जगावं हे कुणीही सांगू शकत नाही. तिची एक जीवनशैली आहे ती जगते आहे तिचा आदर करावा. असं म्हणत संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे दोघंही आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी हे उत्तर दिलं.

काय घडली घटना?

साम मराठी या वाहिनीच्या पत्रकार रूपाली बडवे या मंत्रालयात गेल्या होत्या. त्यांनी संभाजी भिडे मंत्रालयात आले होते म्हणून त्यांना गुरूजी तुम्ही कुणाची भेट घेतली हा प्रश्न विचारला. त्यावर संभाजी भिडे म्हणाले की तू आधी टिकली लाव तर तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू/ टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलेन असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं यावरून बराच वाद झालेला पाहण्यास मिळाला. याबाबत आता अमृता फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

शिवप्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणांसाठी तसंच विविध प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. भाजपने त्यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या नंतर संभाजी भिडे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून चर्चा होते आहे तसंच त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकाही केली जाते आहे.

    follow whatsapp