Crime News : सोशल मीडियावरील मैत्री एका 23 वर्षीय तरुणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून भयानक मानसिक आणि शारीरिक छळाचे कारण ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून 2019 मध्ये पीडितेची ओळख उत्तर प्रदेशातील लोहडरां येथील एका तरुणाशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, तरुणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर बाबा बालक नाथ परिसरात फिरायला नेऊन लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला आणि त्याच वेळी तिचे काही आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बलात्कार प्रकरणातील आरोपीचे पाय धुतानाचे व्हिडीओ व्हायरल, आता रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण, काय म्हणाल्या?
ब्लॅकमेल करण्यास सुरुवात
या घटनेनंतर संशयित आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार आपल्याकडे बोलावले. बदनामीच्या भीतीने पीडिता त्याच्याकडे जात राहिली, जिथे तिच्यासोबत मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले जात होते. हा छळ असह्य झाल्याने पीडितेने यातून सुटका करून घेण्यासाठी 2022 मध्ये खरड येथे भाड्याने फ्लॅट घेतला आणि प्रॉपर्टी डीलिंगचे काम सुरू केले, मात्र तिथेही आरोपीने तिचा पाठलाग सोडला नाही.
भावनिक कोंडीत पकडून तक्रार मागे
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिने यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रत्येक वेळी आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न करून तिला भावनिक कोंडीत पकडले आणि तक्रार मागे घेण्यास भाग पाडून तडजोड करण्यास प्रवृत्त केले. इतके होऊनही आरोपीची प्रवृत्ती बदलली नाही आणि त्याने अखेर तिचे आक्षेपार्ह फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्यास सुरुवात केली. यामुळे तरुणीच्या संयमाचा अंत झाला आणि तिने पुन्हा एकदा पोलिसांकडे धाव घेतली.
हे ही वाचा : नवविवाहित तरुणाच्या गुद्दद्वारात 36 तास पाण्याची बाटली अडकली, शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
अखेर पीडित तरुणीने बडसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत 17 मार्च रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावरील मैत्री कशी जीवघेणी ठरू शकते, याचे हे एक विदारक उदाहरण समोर आले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT











