money laundering case : अनिल देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव तथा अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्य शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी वसुलीचं टार्गेट पोलिसांना दिल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या राज्यातील […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:15 AM • 17 Sep 2021

follow google news

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव तथा अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्य शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

हे वाचलं का?

मुंबईचे माजी पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी वसुलीचं टार्गेट पोलिसांना दिल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. दरम्यान, प्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरू आहे.

या प्रकरणात ईडीने देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव तथा अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांना अटक केलेली असून, आता सरकारकडून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. राज्य शासनाने संदर्भातील आदेश गुरूवारी (१६ सप्टेंबर) काढले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात खासगी सचिव पदावर कार्यरत असलेले संजीव पलांडे यांची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांना २६ जून रोजी अमंलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आलेली आहे.

पलांडे यांना ६ जुलै पर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचा पोलीस कोठडीतील कालावधी ४८ तासांपेक्षा अधिक असून, त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (अ) नुसार निलंबित करण्यात येत आहे, असे आदेश शासनाने काढले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, ईडीकडून या प्रकरणाशी संबंधित अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती.

ईडीकडून याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या विविध मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली आहे. नागपूरातील घरं, कार्यालये आणि इतर मालमत्तांची तपासणी केल्यानंतर ईडीने खासगी सचिव संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना अटक केली होती. या सर्व व्यवहारात दोघांचाही सहभाग असल्याचं ईडीकडून यापूर्वी सांगण्यात आलेलं आहे. त्याबरोबर अनिल देशमुख यांनाही अनेकवेळा चौकशीसाठी समन्स बजावलेलं आहे. मात्र, अद्यापही अनिल देशमुख हजर झालेले नाही.

    follow whatsapp