मुंबईकरांनो काळजी घ्या ! शहरात कोरोनाच्या XE variant चा पहिला रुग्ण आढळला

मुस्तफा शेख

• 12:46 PM • 06 Apr 2022

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हळुहळु कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर निर्बंध उठवण्याची घोषणा केली. ज्यात घराबाहेर पडताना मास्क लावण्याचा नियमही रद्द केला आहे. परंतू असं असलं तरीही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब अजुन कायम आहे. कारण शहरात कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई महापालिकेने नुकत्याच केलेल्या Sero Survey मध्ये […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हळुहळु कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर निर्बंध उठवण्याची घोषणा केली. ज्यात घराबाहेर पडताना मास्क लावण्याचा नियमही रद्द केला आहे. परंतू असं असलं तरीही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब अजुन कायम आहे. कारण शहरात कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

हे वाचलं का?

मुंबई महापालिकेने नुकत्याच केलेल्या Sero Survey मध्ये शहरात एका व्यक्तीला XE आणि एका व्यक्तीला कोरोनाच्या Kappa व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलंय. या सेरो सर्वेसाठी २३० रुग्णांचे नमुने पालिकेने घेतले होते, ज्यात २१ रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करावं लागलं. परंतू त्यांना ऑक्सिन किंवा आयसीयूची गरज लागली नाही.

मुंबई महापालिकेने घेतलेल्या २३० रुग्णांच्या नमुन्यांची कस्तुरबा रुग्णालयातील Next Generation Genome Sequencing Lab आणि पुण्यातील National Institute of Virology मध्ये तपासणी करण्यात आली. ज्यात २२८ रुग्ण हे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे तर एक रुग्ण XE आणि एक रुग्ण Kappa व्हेरिएंटचा सापडला आहे. २३० रुग्णांमध्ये ० ते २० वयोगटातील ३१ रुग्ण, २१ ते ४० वयोगटातील ९५ रुग्ण, ४१ ते ६० गटातील ७२ रुग्ण, ६१ ते ८० गटातील २९ रुग्ण आणि ८१ ते १०० वयोगटातील ३ रुग्ण होते.

दरम्यान, ज्या रुग्णाला XE व्हेरिएंटची लागण झाली आहे ती ५० वर्षीय महिला असून तिच्यात कोणतीही लक्षणं दिसत नसून तिला कोणत्याही कोणत्याही प्रकारच्या सहव्याधी नाहीयेत. ही महिला फॅशन डिजायनर असून ती एका शुटींग क्रू मध्ये काम करते. १० फेब्रुवारी २०२२ मध्ये ही महिला दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्याची नोंद आहे. या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतलेले असून विमानतळावर दाखल होताना तिची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती. परंतू यानंतर २ मार्च रोजी पुन्हा एकदा चाचणी केली असता या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. ज्यानंतर या महिलेला हॉटेलमधील रुममध्ये क्वारंटाइन करण्यात आलं. यानंतर ३ मार्चला या महिलेची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली ज्यात तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता.

२३० रुग्णांपैकी ज्या २१ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यात १२ रुग्णांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता तर ९ रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. या २३० रुग्णांपैकी केवळ एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला असला तरीही हा मृत्यू पोटाच्या आजारामुळे झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. या महिला रुग्णाचं वय ४७ होतं आणि त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं पालिकेने सांगितलं.

कोरोना वाढवणार टेन्शन; XE व्हेरियंटबद्दल WHO ने व्यक्त केली चिंता

राज्य सरकारने बाहेर पडताना मास्क घालणं हे ऐच्छिक केलेलं असलं तरीही सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालून फिरावं असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. तसेच ज्या नागरिकांनी अद्याप कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांनी लवकरात लवकरत लसीचे डोस घ्यावेत असं आवाहन पालिकेने केलं आहे.

    follow whatsapp