वेंगुर्ला: शिवसेना (Shiv Sena) आणि राणे कुटुंबीय (Rane Family) यांच्यातील विळ्या-भोपळ्याचं नातं हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. त्यामुळेच गेले अनेक वर्ष राणे कुटुंबीय हे सातत्याने ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेच्या नेत्यांशी दोन हात करत आले आहेत.
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनी कायमच शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. पण असं असताना आता आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी एक अत्यंत मोठं वक्तव्य केलं आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेचे आज उद्घाटन करण्यात आले त्यावेळी भाजप आमदार नितेश राणे, रविंद्र चव्हाण तर शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले. याच कार्यक्रमात नितेश राणे यांनी असं वक्तव्य केलं आहे की, ‘पक्षाने आदेश दिल्यास आम्ही शिवसेनेशी देखील जुळवून घेऊ.’ त्यांच्या याच वक्तव्यामुळे उपस्थितीच्या भुवया देखील उंचावल्या.
दरम्यान, आपलं भाषण संपवून नितेश राणे हे जेव्हा पुन्हा आपल्या जागी आले तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चक्क त्यांची पाठ थोपटली. यावेळी नितेश राणे यांनी अगदी हसतहसत त्यांच्या या कृतीला दाद दिली.
खरं म्हणजे विनायक राऊत यांच्यावर आतापर्यंत राणे कुटुंबीयांनी अनेकदा गंभीर टीका केली आहे. विनायक राऊत यांनीच नितेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत तब्बल दोनदा पराभव केला आहे. त्यामुळे राणे कुटुंबीयांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जाते.
तर विनायक राऊत सुद्धा त्यांना अनेकदा प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असताना आता नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य आणि विनायक राऊत यांनी दिलेली दाद यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
‘…तर शिवसेनेशीही जुळवून घेऊ’
या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी नितेश राणे यांना असा प्रश्न विचारला की, विकासाच्या मुद्द्यावर जसे आपल्यासोबत शिवसेनेचे नेते हे एकत्र दिसले तर राज्यात असं चित्र कधी दिसणार?
त्यावर नितेश राणे असं म्हणाले की, ‘आता ते तुम्ही हा प्रश्न वरिष्ठांना विचारला पाहिजे. मी जसं माझ्या भाषणात बोललो की, पक्षाचा आदेश आला तर आम्ही कोणाबरोबर पण काम करायला तयार आहोत. शेवटी पक्ष आदेश हा महत्त्वाचा आहे. जर पक्षाने आदेश दिला की, आपण एकत्र यायचं तर आमच्यासारखे कार्यकर्ते हे एकत्र काम करणार.’ अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.
दरम्यान, आता या सगळ्या एकूण घडामोडीमुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप एकत्र येणार का? अशी चर्चा त्यानिमित्ताने सुरु झाली आहे.
2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळीही नितेश राणे म्हणाले होते की, आदित्य ठाकरेंच्या सोबत काम करु!
नितेश राणे यांच्या रविवारच्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले असले तरी त्यांनी 2019 सालच्या विधानसभा निवडणुका पार पडण्याआधी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘भविष्यात आम्ही आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिळून काम करु.’
कारण त्यावेळी शिवसेना आणि भाजप हे युतीमध्ये लढत होते. त्यावेळी शिवसेना भाजपची साथ सोडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे जर राज्यात पुन्हा सत्ता आली तर आपल्याला शिवसेनेसोबत काम करावं लागू शकतं ही गोष्ट लक्षात घेऊन नितेश राणे यांनी अत्यंत धोरणीपणाने तशा स्वरुपाचं वक्तव्य केलं होतं
आदित्य ठाकरेंची DNA टेस्ट करा.. ही वादग्रस्त मागणी करणाऱ्या नितेश राणेंनी व्यक्त केली दिलगिरी
दुसरीकडे नितेश राणे यांनी त्यावेळी जे वक्तव्य केलं होतं त्यावर त्यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे यांनी त्यांना खडे बोल सुनावले होते.
दरम्यान, आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी अशाच स्वरुपाचं वक्तव्य केल्याने आता निलेश राणे हे नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
