Crime News : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात मंझनपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर मधुचंद्र होण्यापूर्वीच नवविवाहित वधूने कथित प्रियकरासोबत रोख रक्कम आणि दागिने घेऊन पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी रोजी भारतीय सेनेतील एका जवानाचे लग्न सराय अकिल पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीसोबत पारंपरिक पद्धतीने आणि सर्व विधीवत पार पडले. लग्नानंतर वधूची विधिवत पाठवणी झाली आणि ती सासरी दाखल झाली. नव्या सुनेच्या स्वागतासाठी घरात उत्साहाचे वातावरण होते. कुटुंबीयांनी तिच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती.
मात्र, लग्नाच्या अवघ्या दोन-तीन दिवसांतच धक्कादायक घडामोड उघडकीस आली. 10 ते 11 फेब्रुवारीच्या मध्यरात्री दरम्यान संबंधित नववधू सासरच्या घरातून अंदाजे पाच लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे पंधरा लाख रुपयांचे दागिने घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली; मात्र ती कुठेच आढळली नाही.
हेही वाचा : केबिनमध्ये बोलवून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, नामांकित शाळेतील प्रकार; मुख्याध्यापकाला पालकांनी दिला चोप
पीडित पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, सराय अकिल परिसरातीलच एका तरुणाने त्याच्या पत्नीला गोड बोलून पळवून नेले आहे. संबंधित तरुण हा तिचा आधीपासूनच परिचित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधांचा अँगलही पुढे येत असून, लग्नापूर्वीच दोघांमध्ये संबंध होते का, याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, परिसरात आणखी एक चर्चा रंगली आहे. वधूला वराचा सावळा रंग पसंत नव्हता आणि तिने याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. तथापि, या दाव्यांबाबत पोलिसांनी अधिकृत पुष्टी केलेली नाही. पोलिसांचा तपास या सर्व बाबींच्या अनुषंगाने सुरू असून, हा प्रकार पूर्वनियोजित कटाचा भाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे.
पीडित जवानाने दिलेल्या लेखी तक्रारीवरून संबंधित संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नववधू आणि तिच्या कथित प्रियकराचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली असून, त्यांच्या संभाव्य ठिकाणांची पडताळणी केली जात आहे. मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लग्नासारख्या पवित्र नात्यात घडलेल्या या प्रकारामुळे समाजात विविध चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येईल, असे स्पष्ट केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











