मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. परंतु, केवळ एखाद्या विधानावरुन त्यांना कोंडीत पकडू नये, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केलं. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
एकमेकांच्या राजकीय नेत्यांवर, आदर्श व्यक्तींवर केलेल्या टीकेवरून राज्यात आधीच वातावरण तापलं होतं. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केलं, त्यावरून वाद निर्माण झाला. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत राज्यापालांच्या विरोधात आंदोलन केलं. तर भाजपकडून मात्र यावर सावध प्रतिक्रिया देण्यात येत आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे :
भारतीय जनता पक्षाचे 18 कोटी कार्यकर्ते छत्रपती शिवादी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात. छत्रपती शिवरायांचे इतिहासातील महत्व कोणीही कमी करु शकत नाही.
भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वायाच्या 79 व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले. पदवीदान समारंभात जे वक्तव्य झाले त्याचे कोणीही समर्थन करत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरुन त्यांना कोंडीत पकडू नये.
बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत लाजिरवाण्या शब्दात टीका केली त्याची संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली. पण आदित्य ठाकरेंनी त्यांची गळाभेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदुत्व, शिवाजी महाराज, सावरकर या विषयांची काळजी असती तर अशी गळाभेट घेतली नसती.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या वादावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, या पृथ्वीवर आहे. तो पर्यंत महाराष्ट्राचे, देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत.
आजच्या भाषेत सांगायच झालं तर छत्रपती शिवाजी महाराज हेच हिरो आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. राज्यपालांच्या मनात देखील काही शंका नाही.
राज्यपालांच्या बोलण्याचे निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. मला एक वाटतं की, त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श देशात आणि महाराष्ट्रात असू शकत नाही, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
ADVERTISEMENT











