ED चा फास BMC पर्यंत : आयुक्त इक्बालसिंह चहल रडारवर; चौकशीसाठी समन्स

दिव्येश सिंह

13 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:16 AM)

मुंबई : आमदार आणि सरकारमधील मंत्र्यानंतर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाचा फास आता मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहचला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ईडीने कोविड सेंटर वाटप प्रकरणासंदर्भात समन्स बजावले आहे. सोमवारी (१६ जानेवारी) रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी यापूर्वी नोंदवलेल्या आणि पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेल्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : आमदार आणि सरकारमधील मंत्र्यानंतर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाचा फास आता मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहचला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ईडीने कोविड सेंटर वाटप प्रकरणासंदर्भात समन्स बजावले आहे. सोमवारी (१६ जानेवारी) रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

मुंबई पोलिसांनी यापूर्वी नोंदवलेल्या आणि पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर वाटप प्रकरणासंदर्भात इक्बालसिंह चहल यांना समन्स बजावण्यात आले आहे. सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदारांना मुंबई आणि पुण्यातही कोविड केंद्र देण्यात आल्याचा, आरोप त्यांच्यावर आहे.

उद्योगपती सुजित पाटकर हे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. संजय राऊत यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात आली होती. पत्रा चाळ प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने सुजित पाटकर यांच्या घराची झडती घेतली होती. पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुलींसह मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या वाईन वितरण कंपनीत अतिरिक्त संचालक होते.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या रेकॉर्डनुसार १६ एप्रिल २०२१ रोजी पाटकर आणि संजय राऊत यांच्या मुलींची फर्ममध्ये अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अलिकडेच राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कंपनीचा मुख्य व्यवसाय वाइन ट्रेडिंगमध्ये बदलल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

कोविड फील्ड हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन करण्यासाठी उद्योगपती सुजित पाटकर यांनी मुंबई महापालिकेसोबत करार केल्यानंतर सुमारे एका वर्षानंतर करारावर स्वाक्षरी केली. त्यावेळी त्यांच्या कंपनीच्या खात्यात ३२ कोटी रुपये जमा झाले आणि यासंबंधीची काही कागदपत्र अंमलबजावणी संचालनालयाला त्यांच्या घरी छापेमारी करताना सापडले होती.

आपल्या नोंदणी नसलेल्या कंपनीमार्फत बीएमसीचे कंत्राट मिळवून पाटकर यांनी हे काम एका डॉक्टरकडे सोपवले आणि कंपनीच्या नावावर फील्ड हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन करण्याचा करार केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, बीएमसीकडून कराराशी संबंधित कागदपत्रे आरटीआयद्वारे मिळवली होती. यात पाटकर यांना सुमारे १०० कोटी रुपयांचे फील्ड हॉस्पिटलचे व्यवस्थापन करण्याचे कंत्राट मिळाले होते. आरटीआयद्वारे मिळालेल्या कागदपत्रांवरून सोमय्या यांनी दावा केला की, हे करार फसवणूक करुन केले गेले आणि काम मिळाल्यानंतर एक वर्षाने करार करण्यात आला. पाटकर यांनी अशी मुंबईत चार आणि पुण्यात एक कंत्राट पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने फसवणूक करून मिळवली होती.

    follow whatsapp