ज्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत तोच अच्छा दिन आहे असं मोदी सरकारने जाहीर करावं असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आपल्या देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत त्यावरूनच मोदी सरकारवर प्रियंका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. सध्या आठवड्याचे सातही दिवस हे महंगे दिन आहेत. कारण पेट्रोल डिझेलचे दर रोज वाढत आहेत अशात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत तोच अच्छा दिन आहे असं मोदी सरकारने जाहीर करावं असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
प्रियंका गांधी यांनी टीका करत असतानाच मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी असलेले पेट्रोलच्या दरांचं एक पत्रकही पोस्ट केलं आहे. पेट्रोल आणि डिझेल यांचे दर रोज कसे वाढत आहेत हे त्यामध्ये दाखवण्यात आलं आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९० रुपयांवर पोहचले आहेत. तर मुंबईत हे दर प्रति लिटर ९६ रुपयांवर पोहचले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर हे दिल्लीत ८० रुपये प्रति लिटरवर तर मुंबईत ८७ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहेत.
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
प्रियंका गांधींसोबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यासाठी त्यांनी महागाई किती वाढली आहे असा मथळा असलेल्या हेडलाईन्सही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केल्या आहेत. एवढंच नाही तर हा तर महागाईचा विकास झाला आहे असाही टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे रॉबर्ट वाड्रा यांनीही जोपर्यंत इंधनाचे दर म्हणजेच पेट्रोल डिझेलचे दर कमी होत नाहीत तोपर्यंत ऑफिसला जाण्यासाठी सायकल वापरावी असं म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही पेट्रोल डिझेल दरवाढीवरून ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. गेल्या ११ दिवसांपासून दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या UPA च्या कार्यकाळात असलेल्या किंमतींपेक्षा अर्ध्यावर आल्या आहेत तरीही आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेल महाग झालं आहे. मोदी सरकारने पेट्रोलवर प्रति लिटर ३२रुपये ९० पैसे आणि डिझेलवर प्रति लिटर ३१ रुपये ८० पैसे एक्साइज ड्युटी लावतं त्यामुळे हे दर वाढले आहेत असंही गेहलोत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
