ADVERTISEMENT
Bhiwandi Nizampur City Municipal Corporation : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेची स्थापना सन 2002 मध्ये करण्यात आली. भिवंडी आणि निजामपूर या जुळ्या शहरांचे प्रशासन पाहण्याची जबाबदारी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडे आहे. सध्याच्या, म्हणजे 2020 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार या महानगरपालिकेत एकूण 84 प्रभागांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भिवंडी शहरात सध्या 6 लाख 69 हजार 033 मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये सुमारे 3 लाख 80 हजार 623 पुरुष मतदार असून 2 लाख 88 हजार 097 महिला मतदारांचा समावेश आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भिवंडीत अटीतटीची आणि चुरशीची राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भिवंडी शहराचा ऐतिहासिक प्रवास
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचा इतिहास समृद्ध आणि दीर्घकालीन आहे. भिवंडी शहराची मुळे आठव्या शतकापर्यंत जातात. त्या काळात हे शहर राजा भीमदेवाच्या अधिपत्याखाली होते आणि तेव्हा याचे नाव ‘भीमदी’ असे होते. कालांतराने भीमदीचे रूपांतर भिवंडी या नावात झाले.
सोळाव्या शतकात भिवंडी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात होते. येथील बंदरामुळे कापड, मसाले तसेच इतर विविध वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे. 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडीला भेट देऊन या शहराचे सामरिक आणि व्यापारी महत्त्व ओळखले. त्यानंतर 1720 मध्ये पेशवा बाजीरावांनी भिवंडी स्वराज्यात समाविष्ट केली. त्यामुळे ऐतिहासिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून भिवंडीचे स्थान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे.
2017 च्या भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची शेवटची सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती. त्या वेळी महानगरपालिकेत एकूण 90 प्रभाग होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक म्हणजे 47 जागांवर विजय मिळवून सत्ता प्रस्थापित केली होती. भाजपने 19 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेला 12 जागांवर समाधान मानावे लागले होते. समाजवादी पक्षाला 2 जागा, कोणार्क आघाडीला 4 जागा, तर इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मिळून 10 प्रभागांवर विजय मिळवला होता.
भिवंडीतील राजकीय गणित
भिवंडी महानगरपालिकेच्या राजकारणात मुस्लीम मतदारांची भूमिका अत्यंत निर्णायक मानली जाते. याच मतदारसंख्येच्या जोरावर काँग्रेस पक्षाने अनेक वर्षे महानगरपालिकेवर वर्चस्व राखले होते. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने 90 पैकी 47 जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली होती. मात्र, अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळतीचा सामना करावा लागला. अनेक नगरसेवकांनी एमआयएमसह इतर पक्षांत प्रवेश केल्याने काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमकुवत झाली. तरीसुद्धा, भिवंडीतील काँग्रेसचा जनाधार पूर्णपणे संपलेला नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत भाजपने भिवंडी महानगरपालिकेत आपली पकड हळूहळू मजबूत केली आहे. पूर्वी एकसंध असलेली शिवसेना आता दोन गटांत विभागली गेल्याने त्याचा परिणाम स्थानिक राजकारणावरही दिसून येतो. भिवंडी हे ठाणे जिल्ह्यालगत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकदही येथे लक्षणीय असल्याचे मानले जाते.
भिवंडी महानगरपालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ (2017)
एकूण जागा – 90
काँग्रेस – 47
भाजप – 19
शिवसेना – 12
समाजवादी पक्ष – 2
कोणार्क आघाडी – 4
इतर – 10
भिवंडी महानगरपालिकेतील आरक्षण रचना
भिवंडी महानगरपालिकेतील आरक्षण रचना विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देणारी आहे.
अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी 3 जागा राखीव असून त्यापैकी 2 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी 1 सर्वसाधारण जागा राखीव आहे.
नागरिकांचा मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी एकूण 24 जागा असून, त्यातील 12 जागा OBC महिला उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारण (Open) प्रवर्गासाठी 62 जागा असून, त्यातील 31 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
या आरक्षण व्यवस्थेमुळे भिवंडी महानगरपालिकेत महिलांना आणि विविध सामाजिक घटकांना संतुलित व व्यापक प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











