पुणे महानगरपालिका : पहाटे तीनपर्यंत बैठक तरीही दोन्ही राष्ट्रवादीचं फिस्कटलं, मित्र पक्षांकडे परतण्याचा निर्णय

Pune Mahanagar Palika Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पहाटे तीन वाजेपर्यंत चालली. या बैठकीत पुणे महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील तीन दिवसांपासून अजित पवार गटासोबत सुरू असलेल्या चर्चांमधून ठोस निष्कर्ष निघत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर महाविकास आघाडीसोबतच पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

Pune Mahanagar Palika Election

Pune Mahanagar Palika Election

मुंबई तक

27 Dec 2025 (अपडेटेड: 27 Dec 2025, 12:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे महानगरपालिका : पहाटे तीनपर्यंत बैठक तरीही दोन्ही राष्ट्रवादीचं फिस्कटलं

point

मित्र पक्षांकडे परतण्याचा निर्णय

Pune Mahanagar Palika Election : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकत्र लढण्याची चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील समन्वय साधण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

पहाटे तीन वाजेपर्यंत बैठक, तरीही काका-पुतण्याचं जमेना

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पहाटे तीन वाजेपर्यंत चालली. या बैठकीत पुणे महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील तीन दिवसांपासून अजित पवार गटासोबत सुरू असलेल्या चर्चांमधून ठोस निष्कर्ष निघत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर महाविकास आघाडीसोबतच पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांकडून कोणताही अंतिम निर्णय किंवा स्पष्ट भूमिका समोर न आल्याने ही चर्चा फिस्कटल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. या दोन्ही नेत्यांशी सल्लामसलतीनंतर पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढावी, यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये एकमत झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेससोबत पुन्हा समन्वय साधण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

हेही वाचा : पुणे : थायलंडची ट्रीप अन् हेलिकॉप्टर राईडची ऑफर; महापालिका निवडणुकीत मतदारांची 'दिवाळी'; प्रभाग कोणता?

महत्त्वाची बाब म्हणजे, शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेल्यास पुण्यात उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस स्वतंत्रपणे एकत्र लढण्याची शक्यता होती. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात महाविकास आघाडीतील तीन जुने भागीदार शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात बैठकांना सुरुवात झाली आहे. या बैठकींमध्ये जागावाटप, प्रचाराची दिशा आणि संयुक्त रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादींमधील मतभेद स्पष्ट झाले. पुणे महानगरपालिकेत शरद पवार गटाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढावीत, या भूमिकेवर अजित पवार ठाम होते. तसेच शरद पवार गटाने मागितलेल्या 68 जागांची मागणीही अजित पवारांनी फेटाळल्याने तणाव अधिक वाढला. या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड न झाल्याने अखेर चर्चा संपुष्टात आल्याचे सांगितले जाते.

अजित पवारांकडून शिंदेंसोबत युती करण्याच्या हालचाली

दुसरीकडे, अजित पवारांनी पर्यायी राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संपर्क साधत मदतीची मागणी केल्याची माहिती आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू असून, पुण्यात भाजपविरोधात शिवसेना (शिंदे गट) मधील कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेला रोष लक्षात घेता, शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवारांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केल्याचे समजते. एकूणच पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्र येण्याचे स्वप्न तूर्तास भंगले आहे. आगामी दिवसांत महाविकास आघाडी आणि महायुतीतील हालचालींमुळे पुण्यातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

प्रेयसीचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न, प्रियकराने थेट स्वतःची किडनी विकली; महाराष्ट्रातून अवयव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

 

    follow whatsapp