Congress candidates list for Solapur Mahanagar palika election : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, कोल्हापूरनंतर आता सोलापूर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका निवडणूक 2026 साठी काँग्रेसने 10 प्रभागांमधील 20 अधिकृत उमेदवारांची घोषणा करत राजकीय वातावरण तापवले आहे.
ADVERTISEMENT
या पहिल्या यादीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसने सामाजिक समतोल साधत विविध प्रभागांतून प्रभावी उमेदवार मैदानात उतरवले असून, यामध्ये माजी आमदार, माजी महापौर आणि ओळखीच्या राजकीय कुटुंबांतील नावांचा समावेश आहे.
जाहीर झालेल्या यादीत माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सून सीमा मनोज यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा परवीन आरिफ शेख, तसेच माजी महापौर संजय हेमगड्डी यांचा समावेश आहे. याशिवाय प्रभागनिहाय विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सोलापूरसाठी जाहीर झालेल्या या पहिल्या यादीमुळे काँग्रेसने शहरातील निवडणुकीची तयारी जोरात सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित प्रभागांसाठीची दुसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेसाठीही काँग्रेसने 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील काँग्रेस गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनांनुसार, तसेच आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी मंजूर करण्यात आली.
कोल्हापूरसाठी जाहीर झालेल्या यादीत अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचा समावेश असून, काँग्रेसने अनुभवी नेतृत्वावर भर दिल्याचे दिसून येते. याबाबत सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत ज्या जागांवर चर्चा सुरू आहे, त्या जागांचा समावेश या यादीत करण्यात आलेला नाही. जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
कोल्हापूर आणि सोलापूर या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये एकाचवेळी उमेदवार जाहीर करून काँग्रेसने महापालिका निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून, आगामी काळात इतर महापालिकांतील यादीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











