Sushma andhare on Rupali Chakankar : नाशिक पोलिसांनी स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 18 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजता नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कारवाई केली. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. कॅप्टन खरात हा नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या सिन्नर येथील मंदिराला भेट दिली होती, तेव्हापासून चर्चेत होता. दरम्यान, आता या कथित ज्योतिषाला बलात्कार प्रकरणातील अटकेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत गंभीर आणि सनसनाटी आरोप केले आहेत. खरात याच्याकडून पोलिसांनी 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर येत असून, यामध्ये अनेक सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध महिलांचे चित्रण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
महिला आयोगाच्या अध्यक्षांवर गंभीर ठपका; सुनेत्रा पवारांकडे कारवाईची मागणी
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. अंधारे यांच्या दाव्यानुसार, खरात याने स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर या 'संचालक' म्हणून कार्यरत आहेत. इतकेच नव्हे, तर यापूर्वी जेव्हा खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संबंधित संस्थेवर दबाव आणला आणि खरातसाठी माफीनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक आरोपही अंधारे यांनी केला आहे. खरातच्या घरातील लग्नकार्यात चाकणकर यांनी जातीने हजेरी लावली होती, असेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, "अशा लिंगपिसाट माणसाला मदत करणाऱ्या चाकणकरांना पदावर ठेवावे का?" असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला असून, त्यांनी राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : नाशिक : महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, ज्योतिषाला अटक; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगून आलेला चर्चेत
सुषमा अंधारेंची पोस्ट जशीच्या तशी
"कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे...
अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभागत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे...? "
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











