कोल्हापूर महानगरपालिका : अखेर महाडिकांचा पुत्र निवडणुकीच्या रिंगणात, कृष्णराज यांनी कोणत्या वार्डातून भरला अर्ज?

मुंबई तक

Kolhapur Mahanagar Palika Election : कृष्णराज महाडिक यांचा यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस होता. मात्र त्या वेळी त्यांना उमेदवारीची संधी मिळाली नव्हती. 2024 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ते पुढील राजकीय वाटचालीसाठी तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

ADVERTISEMENT

Kolhapur Mahanagar Palika Election
Kolhapur Mahanagar Palika Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर महानगरपालिका : अखेर महाडिकांचा पुत्र निवडणुकीच्या रिंगणात,

point

कृष्णराज यांनी कोणत्या वार्डातून भरला अर्ज?

Kolhapur Mahanagar Palika Election : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग क्रमांक तीनमधून कृष्णराज धनंजय महाडिक यांनी आज (दि.27) अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी पारंपरिक पद्धतीने आजी, आई आणि वडील यांच्या पायांवर डोके ठेवून आशीर्वाद घेतले. या भावनिक क्षणाने परिसरात उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. अर्ज दाखल करण्याच्या वेळी कृष्णराज महाडिक यांचे त्यांच्या आई अरुंधती महाडिक, आजी आणि वहिनींनी औक्षण केले. कुटुंबीयांच्या आशीर्वादाने राजकीय प्रवासाची सुरुवात होत असल्याची भावना यावेळी कृष्णराज यांनी व्यक्त केली.

कृष्णराज महाडिक यांचा यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस होता. मात्र त्या वेळी त्यांना उमेदवारीची संधी मिळाली नव्हती. 2024 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ते पुढील राजकीय वाटचालीसाठी तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशा परिस्थितीत त्यांनी थेट महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याने कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, आता कृष्णराज महाडिक यांच्याविरोधात काँग्रेसकडून सतेज पाटील कोणाला उमेदवार देतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

हेही वाचा : पुणे महानगरपालिका : पहाटे तीनपर्यंत बैठक तरीही दोन्ही राष्ट्रवादीचं फिस्कटलं, मित्र पक्षांकडे परतण्याचा निर्णय

कृष्णराज महाडिक हे नाव कोल्हापूरसाठी नवखे नाही. ‘क्रिश महाडिक’ या नावाने ते सोशल मीडियावर सक्रिय असून तरुणांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर ते सातत्याने स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात. कधी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ते आवाज उठवतात, तर कधी थेट गावात जाऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्याचे व्हिडिओ ते स्वतः शेअर करतात. त्यामुळे केवळ राजकीय पार्श्वभूमीमुळे नव्हे, तर त्यांच्या सक्रिय सहभागामुळेही तरुण वर्गात त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीत कृष्णराज महाडिक यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक तीनमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काळात त्यांच्या प्रचाराची दिशा, मुद्दे आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp